पुण्यात ठाकरेंना धक्का; ‘फायरब्रँड’ नेत्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

पिंपरी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शहरात मोठे भगदाड पडले आहे. शहरातील आक्रमक चेहरा म्हणून परिचित असलेल्या माजी नगरसेविका आणि महिला आघाडी संघटिका सुलभा उबाळे तसेच शहर संघटक संतोष सौंदणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शाखाप्रमुखांनी ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शहर पातळीवरील अनेक पदाधिकारी, महिला व युवा आघाडीचे पदाधिकारी आणि शाखाप्रमुखांनी देखील पक्ष सोडला आहे. मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला.
सुलभा उबाळे या पिंपरी चिंचवड महापालिकेत १९९७ च्या निवडणकीत शिवसेनेकडून नगरसेविका म्हणून प्रथम विजयी झाल्या. तीन वेळा महापालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी कारकिर्द गाजवली. विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला पळता भुई थोडी केली होती. हवेली तालुक्याचे विभाजन झाल्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या भोसरी विधानसभा मतदारंघातून तत्कालीन आमदार विलास लांडे यांच्याविरोधात त्यांनी चुरशीची लढत दिली. त्यावेळी अवघ्या १२०० मतांनी पराभव झाला होता.
पुढे २०१४ मध्ये त्यांना पुन्हा शिवसेनेने उमेदवारी दिली होती. दोन वेळा त्यांचा पराभव झाला. शिवसेनेचा सलग तीस वर्षांचा सलोखा संपवून सुलभा उबाळे यांनी शिंदेंच्या बरोबर जाणे पसंत केल्याने शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संतोष सौंदणकर हे बिकट काळातदेखील पक्षासोबत होते. पक्षासाठी सतत झटणारे अनेक आंदोलने आणि कार्यक्रमात पुढे राहणारे सौंदणकर यांनी संघटक म्हणून जबाबदारी चोख पार पाडली होती. पक्षफुटीनंतर शहरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एक प्रमुख चेहरा म्हणून ते दिसत होते. परंतु लोकसभा निवडणुकीपासूनच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.





