“…अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांनी राज्यात रान उठले होते. मात्र या सर्व चर्चांना स्वतः अजित पवार यांनी पूर्णविराम देत शेवटच्या श्वासात श्वास असे पर्यंत राष्ट्र्वादीतच राहणार असल्याचे म्हटले होते. त्यातच आता अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठा दावा केला आहे. आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर काय, आता म्हटलं तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला १०० टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली आहे.त्यांच्या या वक्तव्यावर आता खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी मत व्यक्त करत, “मुख्यमंत्री होण्यास कोणाला आवडणार नाही. अजित पवारांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणात असून, मंत्रीही होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं. अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात,” असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.
एका वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी म्हटलं, “सन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७१ तर काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले होते. त्यावेळी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी मिळेल अशी शक्यता होती. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनाही तसेच वाटत होते. पण, दिल्लीत काय घडले माहिती नाही. काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद दिले गेले. पण, त्यावेळी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आले असते तर कदाचित दिवंगत आर. आर.पाटील मुख्यमंत्री झाले असते.”
“तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. या दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. ठाकरे यांच्यासोबत आनंदाने, समाधानाने काम केले. पण, चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने आणि वरिष्ठांनी सांगितल्यामुळे काम केलं,” असा मोठा खुलासा अजित पवारांनी यावेळी केला.





