Khel Ratna Award : खेलरत्नवरून सुरू असलेल्या वादावर मनू भाकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली” नामांकन भरताना…”

Manu Bhaker Khel Ratna Controversy |- गेल्या दोन दिवसांपासून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचणारी भारताची अव्वल नेमबाज मनू भाकरची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड न झाल्याचा मुद्दा जोर धरू लागला आहे. मनू भाकरचे वडील रामकिशन भाकर यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र दोन ऑलिम्पिक पदके मिळविणाऱ्या मनूने कदाचित नामांकन भरताना माझ्याकडून चुक झाली असेल, असे सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
यापूर्वी मंगळवारी, मनूच्या वडिलांनी मनूने धान्यचंद खेलरत्न पुरस्कारासाठी ऑनलाइन पोर्टलवर तिचे नाव समाविष्ट केले होते. परंतु तरीही 30 नावांच्या यादीमध्ये तिच्या नावाला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे मनू भाकरचे वडील रामकिशन भाकर यांनी एका वृत्तपत्राशी केलेल्या संभाषणात क्रीडा मंत्रालय आणि खेलरत्न पुरस्कारांची अंतिम यादी तयार करणाऱ्या समितीवर टीका केली होती.
क्रीडा मंत्रालयाच्या वतीने मनूने आपले नाव पुरस्कारासाठी दाखल केले नव्हते, असे म्हटले होते. मात्र क्रीडा मंत्रालयाची बाजू मनूच्या वडिलांनी स्पष्ट नाकारली होती.
राम किशन भाकर म्हणाले, ‘मला खेद वाटतो की त्याला नेमबाजी खेळासाठी प्रेरित केले. त्याऐवजी मी मनूला क्रिकेटर बनवायला हवे होते. मग, सर्व पुरस्कार आणि प्रशंसा तिच्याकडे गेली असती. तिने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याची कामगिरी केली होती. अशी कामगिरी यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूने केली नव्हती. माझ्या मुलीने अजून देशासाठी आणखी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मनू भाकरची पहिली प्रतिक्रिया…
सर्वात प्रतिष्ठित असणाऱ्या खेलरत्न पुरस्कारांसाठी सुरु असलेल्या नामांकनाच्या मुद्द्यावर मी हे सांगू इच्छिते की, एक ऍथलिट म्हणून माझी भूमिका ही देशासाठी खेळताना सर्वोच्च प्रदर्शन करणे एवढीच आहे. मला वाटते की, नामांकन दाखल करताना, माझ्याकडूनच काही चूक झाली असण्याची शक्यता आहे. त्या चुकीची पडताळणी करून ती दुरुस्त करण्याचे काम सुरु असल्याचे नेमबाज मनू भाकरने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
— Manu Bhaker🇮🇳 (@realmanubhaker) December 24, 2024
पुढे तिने विनंती केली आहे की, “मला पुरस्कार मिळो किंवा न मिळो, मी वचनबद्ध राहून देशासाठी आणखी पदके जिंकण्याचा प्रयत्न करत राहीन. या प्रकरणावर वेगवेगळे दावे करू नयेत अशी मी सर्वांना विनंती करते.”
देशासाठी पदके जिंकायला नको होती…
या सगळ्या प्रकरणानंतर राम किशन भाकर यांनी या संदर्भात मनूशी बोललो असल्याचे म्हटले होते. या सगळ्या प्रकाराने मी निराश झाले असून, ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकायला नको होते, असे मनू भाकर माझ्याशी बोलताना म्हणाली, असा दावा मनूचे वडील रामकिशन भाकर यांनी केला आहे. या प्रकरणावर अंतिम यादी अजूनही निश्चित झाली नाही. त्यामुळे आगामी एक-दोन दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता असून त्यामध्ये मनूचे नाव अंतिम यादीत असण्याची शक्यता क्रीडा मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.





