मंथन : एक पाहणी; अनेक निष्कर्ष

– चन्द्रशेखर टिळक
भारतीय लोकांचा सर्वात जास्त विश्वास कोणावर आहे, याबाबत एक अहवाल आला आहे. त्यात मांडलेल्या निष्कर्षांमुळे फारच उत्सुकता निर्माण होते. त्या अहवालातील काही उणीदुणी…
‘मिंट’ हे आर्थिक दैनिक त्यांच्या नियतकालिकात वेळोवेळी वेगवेगळ्या पाहण्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करत असते. या पाहण्याचे असे निष्कर्ष मोठे उद्बोधक असतात. अगदी अलीकडेच म्हणजे, 21 नोव्हेंबर 2024 रोजीच्या त्यांच्या अंकात त्यांनी अशाच एका पाहणीचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. भारतीय नागरिकांना कोणत्या क्षेत्रातील मंडळींवर किती प्रमाणात विश्वास आहे हे आजमावण्याचा प्रयत्न ही पाहणी करते. ही पाहणी नेमकी कोणत्या काळात केली गेली, कितीजणांशी बोलून हे निष्कर्ष किंवा आकडेवारी मांडली गेली, भारताच्या कोणकोणत्या भू-भागातील मंडळींना याबाबत बोलते केले गेले याचा उल्लेख या बातमीत नाही. तरीही या पाहणीतील जी आकडेवारी या बातमीत दिली आहे ती नक्कीच विचार करण्याजोगी आहे.
त्या आकडेवारीनुसार, भारतीय नागरिकांचा अनुक्रमे डॉक्टर्स, लष्करी अधिकारी, शिक्षक, शास्त्रज्ञ, न्यायाधीश, बँक अधिकारी व कर्मचारी, इतर सर्वसामान्य भारतीय नागरिक आणि पोलीस यांच्यावर जास्त विश्वास आहे. त्या आकडेवारीनुसार भारतीय नागरिकांचा डॉक्टर्सवर सर्वात जास्त विश्वास आहे. मग ते प्रमाण थोडे थोडे कमी कमी होत (उपरोक्त क्रमाने) पोलीसपर्यंत येते. तरीही डॉक्टर्स मंडळी वरील विश्वासाची टक्केवारी आणि पोलीस मंडळींवर असणार्या विश्वासाची टक्केवारी यात फार अंतर नाहीये.
या पाहणीनुसार, या मंडळींच्या तुलनेत भारतीय नागरिकांचा राजकारणी, शासकीय कर्मचारी, धर्मगुरू, जाहिरात क्षेत्रातील मंडळी, पत्रकार, टीव्ही चॅनेल्स आणि वकील या लोकांवर कमी विश्वास आहे. ही बातमी किंवा या बातमीतील पाहणीचे निष्कर्ष वाचत असताना माझ्या नकळत ही आकडेवारी आणि आपले दैनंदिन अनुभव यांची मनोमन सांगड घातली जाऊ लागली. या लेखाच्या वाचकांनी तसेच करावे त्यासाठी हा लेखप्रपंच! या बातमीतील या पाहणीचे हे निष्कर्ष वाचत असताना मनात आलेले काही विचार…
1. या पाहणीचे निष्कर्ष हे राजकारणी मंडळींवर फारसा विश्वास दाखवणारे नाहीत. त्यामुळे हे निष्कर्ष जाणीवपूर्वक महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुका आणि इतर काही ठिकाणच्या पोटनिवडणुका यांचे मतदान होऊन जाईपर्यंत प्रसिद्ध करण्यात आले नसावेत का?
2. या निवडणुकांत (आणि त्याही आधीच्या अनेक निवडणुकांत) मतदान झाल्यानंतर ज्या मतदानोत्तर चाचण्यांचे (आपल्या नेहमीच्या भाषेत सांगायचे तर, एक्झिट पोल्स) निष्कर्ष कसे तोंडघशी पडतात हे आपणास चांगलेच माहितीचे झाले आहेत. अशा परिस्थितीत साधारणपणे त्याच काळात जाहीर होणारे हे निष्कर्ष कसे आणि कितपत स्वीकारायचे?
3. या पाहणीनुसार भारतीय जनतेचा सर्वात जास्त विश्वास एक व्यावसायिक म्हणून डॉक्टर मंडळींवर आहे. वैद्यराजांना प्रति परमेश्वर मानणार्या आणि ऐन दिवाळीत धन्वंतरी दिन साजरा करणार्या आपल्या संस्कृतीला हे साजेसेच आहे.
पण तरीही योग्य वेळी योग्य डॉक्टर मिळणे हा पूर्णपणे नशिबाचाच भाग असतो, असे उद्गार वारंवार का आणि कसे ऐकू येतात? हॉस्पिटलमधे अॅडमिट होताना रोग्याचे नावसुद्धा विचारण्या अगोदरच मेडिक्लेम किंवा तत्सम आरोग्य विमा आहे ना, हे विचारले जाते, अशी स्थिती फैलावत कशी राहते?
याबाबत लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट म्हणजे करोनाच्या काळात आणि त्यानंतर डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, पॅथॉलोजिकल लॅब्स, औषधी कंपन्या यांच्याबाबत नाराजी जास्त वाढली.
हे केवळ स्थानिक पातळीपुरते खरे नसून अगदी जागतिक पातळीवरसुद्धा खरे आहे. एका जागतिक पातळीवरील नामवंत कंपनीने एकच औषध एकाच वेळी वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या दराने देऊ केले हा किस्सा त्याकाळी खूप रंगला. करोना झाला आहे की नाही याबाबतचे वैद्यकीय अहवाल हा विषयसुद्धा तेव्हा गाजला होता. याचा विपरीत परिणाम संबंधित कंपन्यांच्या आर्थिक व व्यावसायिक कामगिरी (परफॉर्मन्स)वर जरी झाला नसला, तरी त्यांच्या बाबतच्या समज-गैरसमज नक्कीच झाला.
त्यामुळे आज करोना काळ उलटून साडेतीन-चार वर्षे झाली आणि या काळात शेअर बाजाराचे निर्देशांक पुरेसे वधारले असले, तरी औषधी कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव त्या प्रमाणात सुधारलेले नाहीत. तरीही भारतीय नागरिकांचा सगळ्यात जास्त विश्वास, श्रद्धा एक व्यावसायिक म्हणून डॉक्टर मंडळींवरच आहे हे आवर्जून लक्षात घेण्याजोगे आहे. स्थानिक पातळीवर किती पिढ्या, किती प्रमाणात, किती सातत्याने या डॉक्टर्स मंडळींनी काम केले आहे याची ही पोचपावती आहे.
4. या पाहणीत डॉक्टर्सच्या खालोखाल भारतीय नागरिकांचा सर्वात जास्त विश्वास भारतीय लष्करावर आहे. याबाबत कोणाचेही दुमत होणार नाही. दुमत असलेच तर इतकेच असेल की, लष्करावर आमचा डॉक्टर्सपेक्षाही जास्त विश्वास आहे.
5. असाच प्रकार शिक्षक आणि शास्त्रज्ञ यांच्याबाबत होईल.
6. यानंतर या क्रमवारीत असणारा उल्लेख हा न्यायाधीशाबाबत आहे. आंधळी न्यायदेवता वगैरे काहीही म्हटले गेले, तरी त्याचवेळी त्याच न्यायदेवतेच्या दरबारात ‘देर हैं, मगर अंधेर नहीं’ असेही भारतीय जनता मानते. कोर्टाची पायरी होता होईतो चढू नये, अशी पिढीजात शिकवण जरी दिली गेली, तरी प्रसंगी तीच न्याय देईल ही श्रद्धा आजही अबाधित आहे.
सर्वसामान्य माणसाला ‘तारीख पे तारीख’ असे सतावणारी न्यायव्यवस्था प्रसंगी मूठभर निवडक मंडळीसाठी मध्यरात्रीसुद्धा उपलब्ध होत असली, तरी आपली मूलभूत प्रतिमा अबाधित ठेवण्यात ती यशस्वी झाली आहे. म्हणूनच कदाचित आपल्या पक्षाच्या दारुण पराभवाला न्यायपालिका जबाबदार असल्याचा आरोप अलीकडेच संजय राऊत करते झाले असावेत.
7. भारतीय नागरिकांचा तुलनेने कमी विश्वास असणार्यांच्या यादीत सर्वात वरचे स्थान राजकारणी मंडळींचे असणे यात फारसे काही आश्चर्य वाटण्याजोगी परिस्थिती नाही. कोण कोणाबरोबर निवडणूक लढवेल आणि निकालानंतर कोण कोणाबरोबर सत्तेत बसेल हे कदाचित त्यांचे तेही सांगू शकणार नाहीत.
8. राजकारणी मंडळी यांच्यानंतर शासकीय कर्मचार्यांचा नंबर या उतरंडीत लागतो. सध्याच्या राजकीय-सामाजिक वातावरणात त्यांची परिस्थिती ‘शिंगरू मेले हेलपाट्याने’ अशी झाली आहे.
9. यानंतर भारतीय जनतेचा कमी विश्वास असणारी श्रेणी धर्मगुरू ही आहे. याबाबत अनेक वाद, निदान चर्चा होईल, होऊ शकेल आणि ती एकतर्फी निश्चितच नसेल.
10. जाहिरात क्षेत्रातील मंडळी यात गोवण्यात आपणच चूक करत असू. कारण त्यांचे कामच मुळी असलेल्या वस्तूसाठी नसलेली मागणी निर्माण करणे हे आहे. ते त्यांचे काम फारच चोखपणे करत आहेत असाच या पाहणीचा अर्थ आहे.
11. यानंतरचा वर्ग म्हणजे टीव्ही चॅनेल …न बोललेलेच बरे! अशाप्रकारे कोणावर सर्वात जास्त विश्वास आणि कोणावर कमी विश्वास ठेवला जातो, याचे ढोबळ वर्णन आपणासही करता येईल.





