Mansoon News | रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि बीडसाठी यलो अलर्ट..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यांत पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. गुरुवारी (दि. ७) कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
पुढील दोन दिवसांत उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्हे वगळता, उर्वरीत जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. त्यामुळे येथील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. दि. १० ऑगस्टनंतरही पावसाचा जोर कायम राहील, विदर्भातील बहुतांश जिल्हे, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर हलका ते मध्यम आणि काही जिल्ह्यांत मुळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो.





