Yellow Alert : राज्यावर पुन्हा अवकाळीचे सावट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; गारपिटीचाही इशारा
Yellow Alert : विदर्भात उष्णतेची लाट असतानाच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी.

Yellow Alert – तापलेल्या उन्हामुळे राज्यातील हवामानात बदल होताना दिसत असून, पुढील दोन ते तीन दिवस राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाका बसण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला असून, काही जिल्ह्यांमध्ये गारपीठ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज (दि.१८) तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम होती. दि. १९ एप्रिलला पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील बीड, धाराशिव, हिंगोली, लातूर आणि नांदेडमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला असून या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तसेच, विदर्भातील अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असून नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. दरम्यान, शनिवारी विदर्भातील वर्धा येथे हंगामातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर बहुतांश जिल्ह्यातील पारा ४३ ते ४४ अंशावर गेल्याने उन्हाचा चटका अंगाची लाही लाही करत आहे.
पावसाच्या हलक्या सरी…
पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या तापमानात फारसा बदला झाला नाही. मात्र, दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका काहीशा कमी जाणवत असला तरी उकाड्याने हैराण केले आहे. लोहगाव येथे सर्वाधिक ४१.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे तर दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि काही परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.





