Mansa Devi Temple : हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी; 6 भाविकांचा मृत्यू, 35 जण जखमी

हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वार येथील प्रसिद्ध मानसा देवी मंदिरात रविवारी सकाळी चेंगराचेंगरीची भीषण दुर्घटना घडली. यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. यावेळी मंदिर परिसरात विजेचा असल्याची अफवा पसरल्यानंतर भाविकांची भीतीने पळापळ सुरू झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही दुर्घटना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र तोपर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला होता. यातील चार जण उत्तर प्रदेशातील होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हरिद्वारच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या मानसा देवी मंदिरात रविवारी शेकडो भाविक जमले होते.
यावेळी मंदिराचया पायऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याची अफवा पसरली. त्यानंतर भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाल्याने चेंगराचेंगरी झाली. तथापि, गढवालचे डीसी विनय कुमार यांनी विजेच्या धक्क्याची चर्चा फेटाळून लावली आहे. त्यांनी सांगितले की, अपघाताची कारणे तपासली जात आहेत. अपघातात ३५ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे आणि ६ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी त्यांनी दिली.
हा अपघात सकाळी झाला, परंतु तेथील परिस्थिती सामान्य असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानसा देवी अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शोक व्यक्त केला आहे. तसेच या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या उत्तर प्रदेशातील प्रत्येकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.





