Hockey India | मनप्रीत सिंगकडे हॉकी संघाचे नेतृत्व

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकसाठी मिडफिल्डर मनप्रीत सिंग याच्याकडे भारतीय पुरुष हॉकी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. अनुभवी बचावपटू वीरेंद्र लाक्रा आणि हरमनप्रीत सिंग यांना उपकर्णधारपद देण्यात आले आहे. मनप्रीतची ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे.
त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2017 सालची आशिया कप स्पर्धा, 2018 सालातील आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आणि 2019 सालची एफआयएच मालिका जिंकली होती. त्याच्या नेतृत्वात संघाने 2018 सालच्या पुरुष विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
लाक्रा हा संघाचा अनुभवी बचावपटू आहे. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकचा तो यशस्वी खेळाडूही ठरला होता. मात्र, गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तो भाग घेऊ शकला नव्हता.
2015 साली संघात पदार्पण केल्यापासून हरमनप्रीतने सातत्याने सरस कामगिरी केली आहे. 2019 साली मनप्रीतच्या अनुपस्थितीत हरमनप्रीतच्या नेतृत्वात टोकियो येथे ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय संघाने बाजी मारली होती. त्यामुळे संघ पात्र ठरला होता.





