Manoj Jarange : डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगेंचा हुंकार, थेट राज्य सरकारला दिला इशारा, पहा…

छत्रपती संभाजीनगर : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया १७ सप्टेंबरच्या आधी सुरू करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. गॅझेटियरची तातडीने अंमलबजावणी केली नाही तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला सरकारच्या विरोधात आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे, असा इशार जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे.
“१७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. त्याच्या आत हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे. आम्ही जितके कौतुक केले, पुन्हा आम्हाला वाटायला नको की तुम्ही फक्त हुलकावणी देत आहात की काय?” १७ सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हावी अशी माझी सरकारला विनंती आहे आणि यामध्ये कोणताही बदल करू नये असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
तुम्ही आता ठरवलेय तर मनुष्यबळ द्या. तिघांची गावागावातील समिती आहे तिला तातडीने कामाला लावा. हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदीच्या आधारे मराठवाड्यातील मराठ्यांना किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होते तिथपर्यंतच्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू झाले पाहिजे. अन्यथा मला पुन्हा नाइलाजाने मोठा निर्णय घ्यावा लागेल, असे जरांगे म्हणाले आहेत.
वेळ आली तर आमच्या गावात, आमच्या घरी येणे राजकीय नेत्यांना बंद करावे लागेल हे मात्र लक्षात ठेवा. तुमच्यावर कोणी दबाव आणेल.. जीआर कशाला काढला.. हे असे शब्द नको होते.. जर कोणाचं ऐकून आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळे येऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी, ही मी विनंती करत आहे. धमकी नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
गरीबाच्या पोरांनी आणि मी मिळून एक जीआर काढला की हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, अर्धा महाराष्ट्र पागल झाला. काही अभ्यसकही पागल झाले. जीआर आणि त्यातील शब्द बघून आमच्या विरोधातील काही जण तर इतके पागल झाले की त्यांना झोपच येत नाहीये. इतक्या मजबूतीने जर गरीबांच्या पोरांनी जीआर काढला आहे, तर मराठवाडा १०० टक्के आरक्षणात जाणार, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.





