Manoj Jarange : देवेंद्र फडणवीसांमुळे तिसरा खून, मनोज जरांगेंचा संताप

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषण करणारे मराठा नेते मनोज जरांगे यांनी आज (१ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “देवेंद्र फडणवीसांमुळे आमच्यातला तिसरा खून झाला,” असा थेट आरोप करून जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
या आंदोलनादरम्यान एका आंदोलकाच्या मृत्यूनंतर हा वाद अधिक तीव्र झाला असून, जरांगे यांनी फडणवीसांच्या आईला संदेश देण्यापर्यंत मजल गाठली. राज्यभरातील मराठा समाजाच्या लढ्यात हा नवीन ट्विस्ट आल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. आंदोलकांच्या मृत्यूची पार्श्वभूमी आणि जरांगे यांच्या संतापजनक वक्तव्यांमुळे आंदोलनाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीसांमुळे तिसरा खून झाला
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून सुरू असलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एका आंदोलकाच्या मृत्यूबाबत सांगितलं की, “रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत अटॅक येऊन वारला. त्याचं बलिदान गेलं. देवेंद्र फडणवीसांमुळे तिसरा खून झाला आहे आमचा आतापर्यंत.” जरांगे यांनी हा मृत्यू हल्ला असल्याचा दावा केला असून, “आईच्या कुशीत खेळणारं आमचं सोन्यासारखं लेकरू आरक्षणाच्या मागणीसाठी मेलं. याची लाज तुम्हाला वाटू दे,” असा भावनिक सल्ला फडणवीस यांना दिला.
या आंदोलनात आतापर्यंत तीन मृत्यू झाल्याचा दावा करत जरांगे यांनी सरकारला जबाबदार धरलं. “मेला म्हणजे त्याला खूनच म्हटलं जातं,” असं ते म्हणाले. या घटनेची पुष्टी होण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे, पण जरांगे यांच्या आरोपांनी सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे.
तुमच्या लेकराबद्दल जसं बोलता तसं आमच्यासाठी बोलावं
जरांगे यांनी फडणवीस यांच्या आईला थेट संदेश देत म्हटलं, “देवेंद्र फडणवीस यांच्या आईला आमचं एक सांगणं आहे. देवेंद्र फडणवीस जसं तुमचं लेकरू आहे तसं आमच्याही आईचं लेकरू देवेंद्र फडणवीसांनी काल हिरावून घेतलं. तुमच्या लेकराबद्दल जसं तुम्ही बोलता तसं आमच्या लेकराबद्दलही बोलावं तेवढीच अपेक्षा आहे.” हा वक्तव्य इतकं भावनिक आणि कठोर आहे की, ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. जरांगे यांनी पुढे सांगितलं, “गरिबचं लेकरू पायपीठ करत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या दारात आले होते. पण तुमच्या मुलाने त्याचा खून केला. त्याला न्याय दिला नाही.”



