Manoj Jarange : मनोज जरांगेंची एसआयटीकडून २ तास चौकशी; ऑडिओ क्लिपचा पेन ड्राइव्ह घेतला ताब्यात
मी त्यांना क्लिपचा सोर्स देऊ शकत नसल्याचे सांगितले. क्लिप हवी असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सोर्स देणा-या व्यक्तीच्या जीविताची जबाबदारी घ्यावी.

Manoj Jarange – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी एसआयटीकडून आज दोन तास चौकशी करण्यात आली. या तपासासाठी आलेल्या पथकाने जरांगे यांच्याकडून ऑडिओ क्लिप ताब्यात घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत एसआयटीच्या अधिका-यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसेच क्लिपचा मूळ सोर्स देण्यास नकार दिला. सोर्स दिल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले.
एसआयटीचे पाटील साहेब आणि त्यांची टीम क्लिप घेण्यासाठी आली होती. माझा जबाब वगैरे असा काही प्रकार नव्हता. पण क्लिप घेण्याची प्रक्रिया बराच वेळ सुरू होती.
मी त्यांना क्लिपचा सोर्स देऊ शकत नसल्याचे सांगितले. क्लिप हवी असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सोर्स देणा-या व्यक्तीच्या जीविताची जबाबदारी घ्यावी, असेही जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. मराठा समाजाच्या विरोधात हा खूप मोठा डाव होता. या संकटाला मी पुढे जाऊन सामोरा गेलो आहे. यामुळे मला गेल्या तीन वर्षांपासून प्रचंड त्रास सहन करावा लागला.
आंदोलन मोडायचे आणि मला बदनाम करायचे, असे जाहीरपणे नियोजन केले जात होते. काही लोक फक्त आरोप करून मोकळे होत होते. आता जरांगे पाटलांच्या विरोधात बोला आणि पैसे घेऊन जा, अशी नवीन मोहीम सुरू झाली आहे. सरकारकडून ज्यांनी पैसे घेतले आहेत, ते माझ्याकडे येत नाहीत, असेही ते म्हणाले.






