Manoj Jarange Patil | २९ ऑगस्टला ‘चलो मुंबई’ ; जरांगे पाटीलांचा आरपारचा निर्धार..

प्रभात वृत्तसेवा
सारोळा – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा संघर्ष तीव्र केला आहे. याच मागणीसाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत ‘ चलो मुंबई’ या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळत असून, ‘एक घर एक गाडी’ या घोषणेनुसार मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच करावी, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.
जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातूनच मिळाले पाहिजे. याशिवाय इतर कोणत्याही आरक्षणाचा स्वीकार केला जाणार नाही. हे आंदोलन आरपारची अंतिम लढाई असून, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.२९ ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करण्यासाठी जरांगे पाटील यांनी धाराशिव, सांगली, फलटण, भोर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्याला मराठा समाजाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. भोर तालुक्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा मोर्चा ‘भूतो न भविष्यती’ असा रेकॉर्ड ब्रेक असेल आणि आरक्षण मिळाल्यानंतरच मराठा समाज माघारी फिरेल, असा विश्वास व्यक्त केला.
निवडणुकांबाबत समाजच भूमिका घेईल..
मुंबईसह विविध शहरांमध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या संदर्भात बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सध्या मराठा समाजाने कुणाला मतदान करावे किंवा कुणाला नाही, याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील निर्णय समाजच घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान चोरी झाल्याचा आणि बनावट मतदार वाढल्याचा जो आरोप केला, त्यावर जरांगे पाटील यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले.
मुंडे आणि देशमुख हत्या प्रकरणी कारवाईची मागणी..
बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. या प्रकरणात पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी, असे आवाहन त्यांनी केले. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आरोपींना पकडणे हे पोलिसांचे काम आहे, असे त्यांनी सांगितले. समाजातील कोणत्याही व्यक्तीसोबत जात किंवा धर्म पाहून वागले जात नाही, असे स्पष्ट करत आपण जातीच्या पलीकडे जाऊन न्याय देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राखी पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक मराठा भगिनींनी मनोज जरांगे यांना राखी बांधून त्यांच्या संघर्षाला पाठिंबा दिला. ज्ञानेश्वरी मुंडे यांनीही राखी बांधण्यासाठी अहिल्यानगरला भेट देणार आहेत. महिलांच्या या पाठिंब्यामुळे आपल्या लढ्याला बळ मिळाले आहे, असे सांगत त्यांनी सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मराठा महा संघाचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.




