Manoj Jarange Patil | गोळ्या झेलाव्या लागल्या तरी चालेल; पण आरक्षणाशिवाय माघार नाही

प्रभात वृत्तसेवा
जुन्नर – राज्यात आजवर कोणत्याही पक्षाला मराठ्यांशिवाय बहुमताची सत्ता लाभलेली नाही. मराठा समाजाने दिलेल्या पाठबळामुळेच सरकारे उभी राहिली; मात्र याच समाजावर शासनाने अन्याय केला आहे. त्यामुळे मराठा समाजाने आता चालीवर चाल टाकायला शिकले पाहिजे, अशा शब्दांत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आयोजित पत्रकार परिषदेत सरकारला थेट इशारा दिला.
ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनाला अटी-शर्ती घालणे म्हणजे मराठ्यांचा अपमान आहे. सरकारने आडमुठी भूमिका सोडून कोणत्याही विलंब न लावता तातडीने आरक्षण जाहीर करावे. मराठा समाज सामान्य आहे, नियम पाळतो, संयम पाळतो, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो. पण या संयमाची चेष्टा करु नये.
जरांगे पाटील यांनी जाहीर केले की, आज रात्री मुंबईत पोहोचून शुक्रवारी (दि.29) सकाळपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू होईल. आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा. एक दिवसाचे आंदोलन म्हणजे विनोद आहे. आरक्षणासाठी गोळ्या झेलाव्या लागल्या तरी माघार नाही. आता आरक्षणाशिवाय आंदोलन थांबणार नाही.
पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी स्पष्ट केले की, आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. समाजातील प्रत्येक सामान्य मराठा यामध्ये सहभागी आहे. हे आंदोलन कोणी राजकीय नव्हे, तर मराठा बांधवांचे आहे. सरकारने याला परवानगी द्यावी. कारण हे आंदोलन एक दिवसाचे नाही, तर निर्णायक टप्प्यात गेले आहे. शासनाने दिलेली संधी वापरून समाजाचा अपमान न करता सन्मान करावा.
शिष्टमंडळाचा शब्दभंग – आंदोलनाची चेष्टा..
जरांगे पाटील यांनी सांगितले की, सरकारच्या शिष्टमंडळाकडून चर्चा होणार असल्याचा निरोप आला होता. आंदोलनाची दिशा संवादाकडे वळेल, अशी आशा होती. मात्र हे शिष्टमंडळ आलेच नाही. त्यातच आंदोलनासाठी केवळ एक दिवसाची अटी-शर्ती घालून दिलेली परवानगी म्हणजे सरळसरळ समाजाची थट्टा आहे. मराठा समाज आरक्षणाकडे आशेने पाहतोय. त्यांची अपेक्षा मोडून काढणे म्हणजे आगीशी खेळणे आहे, असे ते म्हणाले.
मराठ्यांचा अपमान नको, सन्मान हवा..
जरांगे पाटील यांनी ठणकावले – राज्यात सत्ता मराठ्यांनी दिली. पण उलट शासनाने याच समाजावर गोळ्या झाडल्या, लाठीमार केला. मराठा समाजाने आरक्षण मिळाल्यानंतर शासनाचा सन्मानच करायचा आहे. मुख्यमंत्री नाराजी ओढवून घेऊ नका, उलट समाजाची मने जिंका. आजच तुमच्या हाती संधी आहे – आरक्षण द्या आणि मराठ्यांचा विश्वास संपादन करा. मराठे उपकार विसरणारे नाहीत.




