‘मनोज जरांगेंनी एकच भूमिका घेवून बोलावे’; छगन भुजबळ यांची खोचक टीका

नाशिक – छगन भुजबळ यांना निवडणुकीत पाडू, असे विधान मनोज जरांगे यांनी केले होते. पण मला पाडण्यापेक्षा जरांगेंनी माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी. मला निवडणुकीत पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही.
मला मागच्या पाच दशकांपासून संघर्ष करायची सवय आहे. येवला मतदारसंघात कोणीही येवो, पण मी लाखभर मतांनी निवडून येणार. जरांगेंनी एकच भूमिका घ्यावी आणि मग बोलावे, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला इशारा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधार्यांचे 113 आमदार पाडू, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यांच्या या इशार्यानंतर जरांगे यांच्यावर टीका करत त्यांना थेट माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले आहे.
छगन भुजबळ म्हणाले, रोज रोज भूमिका बदलत बसण्यापेक्षा मनोज जरांगे यांनी 288 उमेदवार उभे करून दाखवावेत. प्रत्येक वेळी भूमिका बदलण्याचे कारण काय? कधी ते उपोषणाला बसतात, दुसर्या दिवशी उठतात.
आता म्हणतात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देऊ. पण मुस्लिमांना 25 वर्षांपूर्वीच आम्ही आरक्षण दिले आहे. पण जरांगे हे अर्धवट ज्ञानाच्या आधारे बोलतात. आता ते शेतकर्यांच्या प्रश्नावर पुढे येत आहेत. त्यांनी एकच काहीतरी करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.





