मन की बात : तिरंग्याचा अपमान पाहून देश व्यथित – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तिरंग्याचा अपमान झाल्याचे बघून साऱ्या देशाला धक्का बसला, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रथमच मोदी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
मन की बात या या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले, 2021 च्या जानेवारीचा आज अखेरचा दिवस आहे. पूर्ण जानेवारी महिना संपून गेला आहे, असे वाटतंच नाही. काळाची गती यालाच तर म्हणतात. जेव्हा आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत होतो, नंतर आम्ही लोहडी सण साजरा केला, मकर संक्रांति साजरी केली, पोंगल, बिहु हे सण साजरे केले, या आताच काही दिवसांपूर्वीच्या घटना वाटतात.
या महिन्यात, क्रिकेटच्या मैदानातूनही खूप चांगली बातमी मिळाली. आमच्या क्रिकेट संघानं सुरूवातीच्या अडचणींनंतर, शानदार पुनरागमन करत, ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. आमच्या खेळाडुंची कठोर मेहनत आणि सांघिक वृत्ती ही प्रेरित करणारी आहे. हे सर्व घडत असताना, दिल्लीत 26 जानेवारीला तिरंग्याचा अपमान झालेला पाहून, देश अत्यंत व्यथितही झाला. आम्हाला आगामी काळ हा नवीन आशा आणि नाविन्यानं भरून टाकायचा आहे, असे ते म्हणाले.
गेल्या वर्षी आम्ही असामान्य संयम आणि धाडसाचं प्रदर्शन घडवलं होतं. यावर्षीही आम्हाला कठोर मेहनत करून आमच्या संकल्पांची पूर्तता करायची आहे. आमच्या देशाला आणखी वेगानं पुढं न्यायचं आहे. या वर्षीच्या सुरूवातीलाच कोरोनाच्या विरोधातल्या आमच्या लढ्याला जवळपास एक वर्ष पूर्ण झालं आहे. ज्याप्रमाणे, कोरोनाच्या विरोधातली आमची लढाई एक उदाहरण म्हणून समोर आली, तसंच, आता आमचा लसीकरण कार्यक्रम हा ही जगात एक उदाहरण ठरत आहे.
आज भारत जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. आम्ही सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाबरोबरच जगात सर्वाधिक वेगानं आमच्या नागरिकांचं लसीकरणही करत आहोत. केवळ 15 दिवसांमध्ये, भारतानं, आपल्या 30 लाखांहून अधिक, कोरोना योद्ध्यांचं लसीकरण केलं असून अमेरिकेसारख्या समृद्ध देशातही, या कामासाठी 18 दिवस लागले होते तर ब्रिटनला तब्बल 36दिवस लागले होते.भारतात बनवलेली लस (मेड इन इंडिया) आज, भारताच्या आत्मनिर्भरतेची प्रतिक आहे, असे त्यांनी सांगितले.
यावर्षापासून भारत, आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव सुरू करत आहे. अशातच, आमच्या त्या महानायकांशी संबंधित स्थानिक स्थळांचा शोध घेण्याचा हा उत्कृष्ट काळ आहे, ज्यांच्यामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले त्यांच्या आठवणी जागवा, असे आवाहन त्यांनी केले.
माय गोव्ह या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या जालन्याचे डॉक्टर स्वप्नील मंत्री आणि केरळच्या पलक्कड इथले प्रल्हाद राजगोपालन यांनी आग्रह केला आहे की मन की बात मध्ये मी आपल्या सर्वांशी रस्ते सुरक्षेविषयी चर्चा करावी. याच महिन्यात 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत आपला देश, रस्ते सुरक्षा महिना म्हणजेच रोड सेफ्टी मंथ साजरा करत आहे. आपला जीव वाचवण्यासाठी असलेल्या या प्रयत्नांमध्ये आपल्याला सर्वांनाच आपलं सक्रिय योगदान दिलं पाहिजे, असे पंतपप्रधान म्हणाले.





