Manjusha Nagpure: अतिक्रमण कारवाईत भेदभाव करू नका
Manjusha Nagpure:

महापौर मंजुषा नागपुरे; आम्ही आदेश दिल्यानंतरच कारवाई
Manjusha Nagpure: महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईत कोणताही भेदभाव करू नका, निवडक कारवाई करू नका, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. कोणत्या राजकीय नेत्याने अतिक्रमण केले असले, तरी ते जमीनदोस्त करा, अशा स्पष्ट सूचना दिल्याचे महापौर मंजूषा नागपुरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. मुख्य सभेत आम्ही आदेश दिल्यानंतरच प्रशासनाने ही कारवाई सुरू केल्याचा दावाही महापौरांनी केला.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना नागपुरे यांनी सध्या महापालिकेतर्फे शहरभर सुरू असलेल्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचे समर्थन केले. अतिक्रमणे प्रशासकराज असतानाही होतीच. गेल्या आठ दिवसांपासून शहरात कारवाई सुरू आहे. त्याला आमचा आणि नागरिकांचाही पाठिंबाच आहे. शहरात चांगले काही घडत असेल, तर सर्वांनी त्याच्या पाठीशी असले पाहिजे, असे नागपुरे म्हणाल्या.
राजकीय लोकांच्या अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याबाबत विचारले असता, महापौर नागपुरे म्हणाल्या, प्रशासनाला पारदर्शक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कारवाईत सिलेक्टिव्ह राहू नका. कोणीही अतिक्रमण केले, तरी कारवाई करा. मात्र, त्यापूर्वी ते अतिक्रमण आहे ना, याची खात्री करून घ्या, असेही सांगितले आहे.
फ्लेक्स कार्यकर्त्यांनी लावले
महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सविरोधात कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एकूण तीन नगरसेवकांना शहर विद्रुपीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत विचारले असता, भिमाले यांनी स्वत: फ्लेक्स लावले नव्हते किंवा लावायलाही सांगितले नव्हते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. सुनील पांडे यांनी लावलेले होर्डिंग अधिकृत परवाना घेतलेले होते. प्रशासनाने कारवाईपूर्वी फ्लेक्स-होर्डिंग अधिकृत आहेत की नाही, हे पाहावे. नागरिकांच्या ते लक्षात येत नाही, अशी पाठराखण महापौर नागपुरे यांनी केली.





