भाजपमधून ठाकरे गटात अन् नंतर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश तरीही निराशाच ; मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेच्या उमेदवारीची हुलकावणी

Manisha Kayande । राज्यातील शिवसेनामध्ये आलेल्या वादळानंतर उद्धव ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या मनीषा कायंदे यांच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यांना पुन्हा विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून हुलकावणी देण्यात आलीय. कारण शिंदे गटाच्या दोन जागांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना विधानपरिषदेची उमदेवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करत आपला शब्दही पाळला आहे. मात्र, यामुळे पुन्हा विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा अपुरीच राहिली.
भाजपमधून ठाकरे गटात अन् नंतर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश Manisha Kayande ।
2012 साली डॉ. कायंदेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर गेल्यावर्षी उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्या एकनाथ शिंदेंच्या गटात गेल्या होत्या. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 2018 साली उद्धव ठाकरे यांनी मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेवर पाठवले होते. विधानपरिषदेतील कार्यकाळ संपल्यानंतर कायंदे यांना पुन्हा विधानपरिषदेवर संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांच्यामुळे मनीषा कायंदे यांचे गणित बिघडल्याचे सांगितले जाते.
मुख्यमंत्र्यांकडून पक्षात वेगळा मेसेज Manisha Kayande ।
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दबावामुळे यवतमाळ-वाशीममधून भावना गवळी आणि रामटेकमधून कृपाल तुमाने या दोघांना एकनाथ शिंदे हे उमेदवारी देऊ शकले नव्हते. तेव्हा एकनाथ शिंदे यांन दोन्ही नेत्यांना विधानपरिषदेत संधी देण्याचा शब्द दिला होता. हा शब्द एकनाथ शिंदे यांनी पाळला आहे. या दोघांना विधानपरिषदेवर संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी पक्षातही योग्य तो संदेश दिल्याचे सांगितले जाते.
विधानपरिषद निवडणुकीत कोणाकोणाला संधी
विधान परिषदेच्या 11 सदस्यांची मुदत 27 जुलै रोजी संपत आहे. या रिक्त होऊ घातलेल्या जागांसाठी 12 जुलैला मतदान होत आहे. यामध्ये पंकजा मुंडे (भाजप), परिणत फुके (भाजप) , सदाभाऊ खोत (भाजप), अमित गोरखे (भाजप), योगेश टिळेकर (भाजप), भावना गवळी (शिंदे गट), कृपाल तुमाने (शिंदे गट) , प्रज्ञा सातव (काँग्रेस), जयंत पाटील (शेकाप), मिलिंद नार्वेकर (ठाकरे गट), शिवाजीराव गर्जे (अजितदादा गट), राजेश विटेकर (अजितदादा गट) यांचा समावेश आहे. दरम्यान, 11 सदस्यांच्या जागेसाठी 12उमेदवार रिंगणात उभे आहेत. त्यामुळे यातून कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणे महत्वाचे आहे.





