Shirur News : कवठे येमाईच्या सरपंचपदी मनीषा भोर यांची बिनविरोध निवड; गावकऱ्यांकडून उत्साहात सत्कार

शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा संजय भोर यांची बिनविरोध निवड झाली असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वीच्या सरपंच ज्योती मुंजाळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी गुरुवारी (ता. १७ जुलै) निवडणूक प्रक्रिया पार पडली.
या निवडणुकीसाठी मनीषा भोर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे, निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. आर. फलके यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडणूक कामकाज ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव आणि ग्रामपंचायत अधिकारी चेतन वाव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
मनीषा भोर यांची निवड झाल्यानंतर गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायत कार्यालयात व परिसरात ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन, फटाके फोडून व हारतुरे घालून त्यांचा उत्स्फूर्त सत्कार केला. यावेळी आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला मंडळ, युवा वर्ग व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावच्या विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार करत, मनीषा भोर यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. “सर्वपक्षीय सहकार्य आणि गावकऱ्यांच्या विश्वासावर मी खरी उतरवेन, विकासाला प्राधान्य देईन,” असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले. या बिनविरोध निवडीमुळे एकात्मता, सलोखा व सहकार्याचे दर्शन पुन्हा एकदा कवठे येमाई ग्रामपंचायतीत घडले आहे.





