Manish Tewari: कराची दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे भारतावर खापर; काँग्रेस म्हणाली, “स्वतःच्या चुका…”
Manish Tewari: कराचीतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले आहेत.

Manish Tewari: कराचीतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील लष्कराने या हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचा दावा केला आहे. या आरोपांना काँग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर देत पाकिस्तानलाच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनीष तिवारी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांच्या २०११ मधील वक्तव्याची आठवण करून दिली. (Manish Tewari)
त्यांनी पुढे म्हटले की, “तुम्ही तुमच्या घरामागे साप पाळून त्यांनी फक्त शेजाऱ्यांनाच चावावे, अशी अपेक्षा करू शकत नाही. अखेरीस ते साप त्यांना वाढवणाऱ्यालाच चावतात.”
Remember what @HillaryClinton told you chaps on October 21 st 2011 with @HinaRKhar in tow
“ You can’t keep snakes in your backyard and expect them only to bite your neighbours. Eventually those snakes are going to turn on whoever has them in the backyard,”
Look within and stop… https://t.co/Ycj1Xv0SW1
— Manish Tewari (@ManishTewari) June 29, 2026
तिवारी यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटले की, देशाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जगभरात दहशतवादाला खतपाणी घालण्याऐवजी तो थांबवावा. “डीप स्टेट” हीच पाकिस्तानची खरी समस्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पाकिस्तानच्या लष्कराचा दावा काय? (Manish Tewari)
पाकिस्तानचे डीजी आयएसपीआर यांनी ‘एक्स’वरील निवेदनात म्हटले की, २७ जून २०२६ रोजी कराचीतील पाकिस्तान रेंजर्स (सिंध) कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला जमात-उल-अहरार या संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांनी केला असून, ही संघटना भारताच्या पाठिंब्याने कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, कॅम्पच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्फोट घडवून आणल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेंजर्सच्या जवानांनी तातडीने कारवाई करत तीन दहशतवाद्यांना ठार केले, तर एक जखमी अफगाण नागरिक जिवंत पकडला.
तीन जवान शहीद, चार जखमी
या चकमकीत पाकिस्तानचे तीन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाल्याची माहिती लष्कराने दिली. तसेच, भारताच्या कथित पाठिंब्याने कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई सुरूच राहील, असा इशाराही देण्यात आला. ‘अझम-ए-इस्तेहकाम’ या दहशतवादविरोधी मोहिमेअंतर्गत सुरक्षा दल आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था देशातील दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी मोहीम अधिक तीव्र करतील, असेही निवेदनात म्हटले आहे.
आसिम मुनीर यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना (Manish Tewari)
निवेदनात लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल, असा निर्धारही पाकिस्तानच्या लष्कराने व्यक्त केला आहे.





