Manipur : मणिपूरमध्ये पोलिस आणि सुरक्षा संस्थांची मोठी कारवाई; ३०० हून अधिक शस्त्रे जप्त

Manipur – मणिपूरमध्ये ३०० हून अधिक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस आणि सुरक्षा संस्थांची ही मोठी कारवाई असून १३-१४ जूनच्या रात्री, मणिपूर पोलिस, सीएपीएफ, आर्मी आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी खोऱ्यातील पाच जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम राबवली.
यामध्ये स्फोटके आणि इतर युद्ध साहित्य जप्त करण्यात आले. १५१ एसएलआर रायफल्स, ६५ आयएनएसएएस रायफल्स, ७३ इतर प्रकारच्या रायफल्स, ५ कार्बाइन गन, २ एमपी-५ गन आणि इतर युद्ध साहित्य जप्त करण्यात आले. एकूण ३२८ बंदुका आणि रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई मणिपूर पोलिसांसाठी, सुरक्षा दलांसाठी एक मोठी कामगिरी आहे. मणिपूर पोलिसांनी म्हटले आहे की, राज्यात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी अशा कारवाईची गरज होती.
नागरिकांनी पोलिस आणि सुरक्षा दलांना सहकार्य करावे आणि बेकायदेशीर शस्त्रांशी संबंधित कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा माहिती जवळच्या पोलिस स्टेशन किंवा केंद्रीय नियंत्रण कक्षाला कळवावी.





