Manikrao Kokate | कृषी मंत्री माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्त्याव्यामुळे अनेकदा अडचणीत सापडले आहेत. यातच आता माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी गेम खेळत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला. त्यांनतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात येऊ लागली. अनेकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याशिवाय राजकीय नेत्यांनीही त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. याआधीही शेतकऱ्यांविरोधात केलेली वादग्रस्त वक्तव्ये आणि फसवणुकीच्या प्रकरणांमुळे कोकाटेंवर टीका झाली आहे. आतापर्यंत माणिकराव कोकाटे यांनी केलेली वादग्रस्त विधान कोणती आहेत? ते पाहुयात…. कृषिमंत्रिपदाची तुलना माणिकराव कोकाटे यांनी कृषीमंत्रिपदाची तुलना ओसाड गावची पाटीलकीशी केली. ज्यामुळे शेतकरी आणि विरोधकांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला. त्यानंतर नाशिकच्या सिन्नर तालुक्यात शेतीच्या नुकसानग्रस्त पाहणीवेळी “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे शेतकऱ्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य कोकाटे यांनी केले. या वक्तव्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाला गंभीरपणे न घेता त्याची टिंगल केल्याचा आरोप विरोधकांनी केला. कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या खर्चावर टीका नाशिकमध्ये शेतकऱ्यांशी बोलताना कोकाटे म्हणाले, “तुम्ही कर्ज घेता, फेडत नाही आणि कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न समारंभावर खर्च करता. शेतीच्या विकासासाठी एक पैसा गुंतवत नाही.” विरोधकांनी यावरून सरकारवर टीका केल्यानंतर कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली. Manikrao Kokate | कांद्याच्या बाजारभावावर शेतकऱ्यांना दोष कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावावर बोलताना कोकाटे म्हणाले होते की, “एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या भावाचा फायदा झाला म्हणून सगळे कांदा लावत सुटतात. पन्नास पटीने लागवड केली तर भाव पडणारच,” असे विधान त्यांनी केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. Manikrao Kokate | शेतकऱ्यांचा अपमान कोकाटे यांनी एका रुपये पीक विमा योजनेवर बोलताना म्हटले होते की, “आजकाल भिकारी देखील एक रुपया घेत नाही, परंतु आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देतोय.” या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाल्याची टीका झाली. फसवणूक प्रकरण आणि शिक्षा कोकाटे यांना 1995 मध्ये फसवणूक आणि सदनिका घोटाळ्याच्या आरोपाखाली नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 50000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यांच्यावर मुख्यमंत्री कोट्यातून नाशिकमध्ये कमी उत्पन्न गटासाठी फ्लॅट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप होता. यामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आले होते. मात्र नाशिक सत्र न्यायालयाने या शिक्षेवर स्थगिती दिली. Manikrao Kokate | विधानसभेतील रम्मी खेळण्याचा प्रकार, शेतकऱ्यांविरोधातील वक्तव्ये आणि फसवणूक प्रकरण यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर असंवेदनशील आणि गैरजबाबदार असल्याचा ठपका ठेवला जात आहे. याप्रकरणी अजित पवार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची भूमिका घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.