Manikrao Kokate : खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात; मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिले निर्देश

मुंबई : खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी करता यावी यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यात सातत्य राखण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे क्रीडा व युवक कल्याण विभागाचा पदभार घेतल्यानंतर क्रीडा मंत्री कोकाटे यांनी आढावा घेतला. यावेळी अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर,आयुक्त शीतल तेली-उगले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, शालेय स्तरावरच विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पोषक वातावरण तयार करण्यात यावे. अद्ययावत क्रीडा सुविधा, प्रशिक्षक, स्पर्धांची संधी यांची पूर्तता करावी. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जे खेळाडू शासनाचे प्रतिनिधित्व करतात त्यांना विविध क्रीडा स्पर्धांतील यशानंतर बक्षीस प्राप्त करण्यास परवानगी देण्यासंदर्भात कार्यवाही करावी.
जास्तीत जास्त प्रशिक्षक निर्माण व्हावेत, जेणेकरून गुणवत्ताधारक खेळाडू वाढतील. प्रशिक्षकांसाठी नव्या योजना तयार कराव्यात. खेळाडूंना शासकीय नोकरीत असलेल्या आरक्षणासंदर्भात पारदर्शक प्रणाली राबविण्यासाठी समन्वयाने काम करावे, जेणेकरून खेळाडूंवर अन्याय होणार नाही. युवकांच्या कल्याणसंदर्भातील योजना राबविण्याबाबत युवकांकडून जास्तीत जास्त सूचना मागवून त्यावर सकारात्मक विचार करावा असे निर्देशही त्यांनी दिले.





