Pune District : कुकडीतील पाणी पेटण्याची चिन्हे!

लेण्याद्री : गेल्या महिन्याच्या 16 तारखेला कुकडी डाव्या कालव्यातून 35 दिवसांचे जंबो आवर्तन सुरू झाले होते. त्यानुसार येडगाव धरणातून 1400 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. गुरुवारी (दि. 6) सकाळी कुकडी धरण शृंखलेत केवळ 38.08 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तर मागीलवर्षी याचदिवशी 46.93 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यानुसार गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा पाणीसाठा सुमारे 13 टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई निर्माण झाली तर पुणे-नगर जिल्ह्यात पाणी पुरवण्यावरून प्रकल्पातील पाणी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दरम्यान, येडगाव धरणाची पाणी पातळी राखण्यासाठी माणिकडोह धरणातून 1200 क्युसेक तर डिंभे डाव्या कालव्यातून धरणातून 600 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे माणिकडोह जलाशयात केवळ 19 टक्के (1.99 टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. या आवर्तनानंतर माणिकडोह धरण तळ गाठणार, असे स्पष्ट चित्र आहे.
कुकडी प्रकल्पातील हे आवर्तन प्रशासकीय नियोजनाप्रमाणे असून जुन्नर व परिसरातील गावांसाठी पिण्याचे पाणी जून अखेरपर्यंत शिल्लक ठेवणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी सांगितले आहे. कुकडी प्रकल्पातील विविध धरणांमधून सोडलेले पाणी येडगाव धरणाच्या साठ्यात जमा होत असते. येथून पुढे जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तसेच करमाळा या भागांत पाणी जात असते. या जंबो आवर्तनात सुमारे 4.5 टीएमसी पाण्याचा वापर होणार असून धरण क्षेत्रातील गावांजवळील धरणाचे पाणी झपाट्याने पुढे जात आहे. येथील नागरिकांना तसेच पशुधनाला येत्या उन्हाळ्यात झळ बसण्याची शक्यता आहे.
पिंपळजोगातून 45 दिवसांचे आवर्तन सुरू
पिंपळगाव जोगा धरणातून 25 फेब्रुवारी पासून 45 दिवसांचे उन्हाळी आवर्तन सुरू झाले असून 225 क्युसेकने कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणामध्ये केवळ 1.34 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असून पुढील आवर्तनासाठी मृतसाठ्याचा वापर करावा लागणार, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभागातून देण्यात आली आहे.
कुकडी प्रकल्पातील धरणांतील गुरुवार (दि. 6) चा पाणीसाठा
उपयुक्त साठा (दलघफू)***टक्केवारी
येडगाव : 1126.53*** 57.95
माणिकडोह : 1997.13***19.62
वडज : 581.74 *** 49.58
पिंपळगाव जोगा – 1348.88*** 34.67
डिंभे : 6247.62***50





