Mani Shankar Aiyar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर (Mani Shankar Aiyar) यांनी आपण गांधीवादी, नेहरूवादी आणि राजीववादी आहोत, मात्र राहुल यांचा अनुयायी नाही, असे पुन्हा स्पष्ट केले. राहुल गांधी हे वयाने आपल्यापेक्षा सुमारे 30 वर्षांनी लहान असून त्यांच्या राजकीय प्रवासात आपल्याला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नसल्याने स्वतःला राहुलवादी म्हणणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले. अय्यर म्हणाले की, लहानपणी महात्मा गांधी यांनी त्यांना मांडीवर घेतल्याची आठवण आहे, त्यामुळे ते स्वतःला गांधीवादी मानतात. तसेच जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात त्यांचे बालपण गेले असल्याने ते नेहरूवादी असल्याचे त्यांनी नमूद केले. राजीव गांधी यांनी पंतप्रधान कार्यालयात संधी दिल्यामुळे आपण राजीववादी झालो, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून लोकशाहीचे जुलूमशाहीत रूपांतर केले होते, हे आपण मान्य करू शकत नसल्याने स्वतःला इंदिरावादी म्हणत नसल्याचे त्यांनी सांगितले. अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांनी तिरुअनंतपुरम येथील कार्यक्रमात केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्या विधानांपासून स्वतःला दूर ठेवत, अय्यर यांचा पक्षाशी सध्या अधिकृत संबंध नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, अय्यर यांनी शशी थरूर, के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांच्यावरही टीका केली. त्यांच्या या वक्तव्यांमुळे पक्षांतर्गत वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.