देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना झटका; ‘या’ विश्वासू व्यक्तीला महत्वाच्या पदावरून हटवलं

मुंबई – मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदावरुन मंगेश चिवटे यांना हटवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख असल्याने एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांनी मोठा झटका दिल्याची चर्चा आहे.
दरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदी रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आले आहे. रामेश्वर नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी होती. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यात रामेश्वर नाईक यांचे मोठे योगदान आहे.
मंगेश चिवटे हे पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत. त्यांनी मुंबईत अनेक वृत्तवाहिन्यांसाठी वार्ताहार म्हणून काम केले आहे. तसेच काही काळ चिवटे यांनी दिल्लीतही पत्रकारिता केली आहे. पत्रकार म्हणून काम करत असतानाच चिवटेंनी गोरगरीब रुग्णांसाठी काम करण्यास सुरुवात केली होती.
या कामाला शासकीय यंत्रणेची ताकद मिळावी, या हेतूने चिवटे यांनी 2015 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची संकल्पना मांडली. मंगेश चिवटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे काही महिन्यांनंतर ही संकल्पना पूर्णत्वास आली आणि या कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील लाखो गरीब आणि अडल्या-नडलेल्या रुग्णांना आर्थिक मदत मिळू लागली.
करोनाच्या काळात मंगेश चिवटे यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली होती. करोनातील कामगिरीमुळे त्यांना आरोग्यदुत म्हणत होते. त्यांची ही धडपड, तळमळ, प्रामाणिकपणा आणि संवादाची शैली पाहूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्यावर विश्वास टाकला.
जरांगेंशी चर्चा करण्यातही अग्रेसर
मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाच्यावेळी जरांगे यांच्याशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळात चिवटेंचा समावेश केला. जरांगेंशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळातील चेहरे प्रत्येकवेळी बदलले, पण चिवटे कायम शिष्टमंडळात राहिले.





