विधवा महिलांचा ‘गंगा भागिरथी’ उल्लेख करण्याचा मंगलप्रभात लोढा यांचा प्रस्ताव; महिला संघटनेचा आक्षेप

मुंबई – विधवा महिलांच्या सन्मानासाठी महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहे. यापुढे विधवा महिलांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र या प्रस्तावावर महिला संघटनांनी आक्षेप घेतला आहे. कारण ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख केल्याने समाजात विधवा महिलांची ओळख जाहीर होऊ शकते. त्यामुळे महिला संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. याशिवाय सोशल मीडियाद्वारे देखील या प्रस्तावाला तीव्र विरोध केला जात आहे.
विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी ‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागिरथी’ हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सचिवांकडे पाठवला आहे. मात्र या प्रस्तावावर चर्चा झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही. विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी हा प्रस्ताव पाठवल्याचे मंगलप्रसाद लोढा यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी दिव्यांग ही संकल्पना जाहीर केली. त्यानुसार महाराष्ट्रातल्या विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागिरथी हा शब्द वापरण्याबद्दलचा प्रस्ताव तयार करून चर्चा करण्याची विनंती या प्रस्तावात करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याकरिता विधवा ऐवजी ‘गंगा भागिरथी’ (गं.भा) हा शब्द वापरण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्याचे महिला व बाल विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्याबद्दल त्यांचे मनपुर्वक आभार.1/2@MPLodha @Maha_MahilaAyog @MahaDGIPR pic.twitter.com/aVpt2yD1mD
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 12, 2023
प्रस्तावात काय लिहिले आहे?
समाजातील उपेक्षित घटकांस विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय व त्यांची प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंग ऐवजी ‘दिव्यांग’ ही संकल्पना जाहीर केलेली असून यामुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यात येऊन त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन यातही आमूलाग्र बदल झालेले आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागिरथी हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन चर्चा करावी.





