मंगलदास बांदल यांना ईडी कोर्टाकडून जामीन मंजूर; सहा महिन्यांनी येणार तुरुंगाबाहेर !

शिक्रापूर : शिरुर गावच्या सरपंच पदापासून आपल्या राजकारणाला सुरुवात करुन जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय झालेले पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडी ने अटक केल्यानंतर ईडीचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी मंगलदास बांदल यांचा जामीन मंजूर केल्याने मंगलदास बांदल हे तब्बल सहा महिन्यानंतर कारागृहाबाहेर येणार असल्याने आता राजकीय व्यक्तींच्या भुवया उंचावल्या आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे मी प्रदेश उपाध्यक्ष असलेले मंगलदास बांदल हे पुणे जिल्ह्यातील एक वादळी व्यक्तीमत्व म्हणून परिचित असून ते प्रत्येक राजकीय पक्षाशी संधान ठेऊन असत, लोकसभा निवडणूकीसाठी वंचित आघाडीने उमेदवार म्हणून घोषित केले मात्र नंतर राजकीय उलथापालथ पाहून वंचित आघाडीने बांदल यांची उमेदवारी रद्द केली होती.
दरम्यान बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार करत बारामती मतदारसंघातील प्रचारात थेट शरद पवार यांच्यावर तर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर टिकास्त्र सोडल्याने पवार कुटूंबावर टिका केल्याने राज्यभर टिकेचा विषय चर्चेत होता, तर २१ ऑगस्ट २०१४ रोजी बांदल यांच्या शिक्रापूर व महंमदवाडी या निवासस्थानी ईडीने कारवाई करत साडेपाच कोटी रक्कम हस्तगत करुन त्यांच्या ८५ कोटी किंमतीच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली.
तर मणीलॉडरींग तसेच अनेक गुन्हे बांदल यांच्यावर दाखल झाले होते. शिवाजीनगर बँक घोटाळा प्रकरणी बांदल यांनी २१ महिने तुरुंगवास भोगल्यानंतर ईडीच्या कारवाईत बांदल यांना ६ महिने कारावास भोगावा लागला आहे. नुकतेच मंगलदास बांदल यांच्या वतीने अॅड. अबाद फोंडा, अॅड. अदित्य सासवडे यांनी ईडी कोर्टात बाजू मांडली असताना ईडीचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी मंगलदास बांदल यांचा जामीन मंजूर केल्याने मंगलदास बांदल हे तब्बल सहा महिन्यानंतर कारागृहाबाहेर येणार आहे.
शिरुर तालुक्यात ठिकठिकाणी जल्लोष !
मंगलदास बांदल यांना ईडीने जमीन मंजूर केल्याने बांदल यांचा कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्रापूर सह शिरुर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत काहींनी सोशल मिडीयावर जल्लोष केला आहे.





