पुणे जिल्हा | बैलगाडा घाटात शौकिनांसाठी केली जातेय मंडपाची सोय

मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गाव गावच्या यात्रा, जत्रा, उत्सवाला सुरुवात झाली असून भर उन्हाळ्यात यात्रेनिमित्त भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीत यात्रा कमिटीच्या वतीने घाटात बैलगाडा शौकिन व प्रेमींसाठी उन्हाच्या झळा लागु नये म्हणून कापडी मंडप बांधून सावलीची सोय केली जात आहे.
गुढीपाडव्यानंतर गावातील यात्रा, जत्रांना, देवाच्या उत्सवाला सुरुवात होते. तालुक्यातील अनेक गावांमध्ये यात्रांचा हंगाम सुरू आहे. यात्रेमध्ये मुख्यत्वे करून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी मोठ्या प्रमाणात कडक ऊन असल्याने गावागावातील यात्रा कमिटीच्या वतीने घाटामध्ये बैलगाडा मालक,
बैलगाडा शौकीन, बैलगाडे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून घाटात बसण्यासाठी कापडी मांडव व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. घाटात दिवसभर बैलगाडा शर्यतीचे आयोजन असते दुपारच्या वेळी कडक उन असल्याने घाटात गर्दी व्हावी उष्माघाताचा त्रास होऊ नहे म्हणुन अनेक घाटांमध्ये कापडी मांडव व पिण्याच्या पाण्याची सोय केली जात असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगितले जात आहे.





