पिंपळे गुरव – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुनी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत भाजी, फळ विक्री शुक्रवारपासून (दि. 17) सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे तात्पुरत्या स्वरूपात ही व्यवस्था करण्यात येत आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये, त्यांच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेने मोकळे मैदानाची जागा निश्चित करून तशी आखणी केली आहे. ग्राहकांसाठी उभा राहण्यासाठी चौकोन आखण्याचे काम सुरू आहे. तसेच विक्रेता व ग्राहक यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्याचे काम केले जात आहे. तसेच दोन ग्राहकांमध्येही अंतर राहण्यासाठी रांगा व चौकोनांची आखणी करण्यात येत आहे. एकाच ठिकाणी भाजी मंडई सुरू केल्याने पोलिसांना लक्ष ठेवणे सहज शक्य होणार आहे. तसेच काही गोंधळ झाला तर नियंत्रणात आणणेही सोपे होणार आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. ही मंडई सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजतापर्यंत सुरू राहील. तसेच मंडईमध्ये येणाऱ्या नागरिकांचा ताप तपासण्याची व्यवस्था येथे केली आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी करणे आवश्यक आहे. महापौर माई ढोरे म्हणाल्या की, पाच एकर जागेत ही भाजी मंडई सुरू करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच येणारा भाजीपाला स्वच्छ व ताजा असेल. नागरिकांनी व विक्रेत्यांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.