Manchar Election: पैशांचे प्रलोभन की विकासाचे आश्वासन? मंचर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला

प्रभात वृत्तसेवा
मंचर – मंचर नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाच्या १६ जागांसाठी आणि एका नगराध्यक्ष पदासाठी मतदान मंगळवार, दि.२ रोजी होत आहे. प्रचाराची धग शिगेला पोहोचली असून मतदार कोणाला साथ देतील.विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांना की लक्ष्मीदर्शन घडविणाऱ्यांना.याबाबत उत्सुकता वाढली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांत विकासकामांबाबत चर्चा जशी रंगली, तशीच पैशांच्या व्यवहाराची कुजबुजही वाढली आहे. काही उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभन दिल्याची चर्चा सुरू असून त्याचा मतदानावर काय परिणाम होणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.दुसरीकडे, अनेक उमेदवारांनी स्वच्छ प्रशासन, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, लाईट यांसारख्या मुद्द्यांवर भर देत मतदारांना विकासाचा शब्द दिला आहे.
तर काही मतदारही ‘यावेळी विकासाला मत’ दिले जाईल, असे मत व्यक्त करत आहेत. मात्र, काही मतदारांमध्ये “जो लाभ देईल, त्यालाच मत” अशीही पाळेमुळे घट्ट मान्यता असल्याने यंदाची निवडणूक अधिकच रोचक बनली आहे.दोन डिसेंबरला कोणत्या विचाराला मतदार साथ देतात, विकासाला की लक्ष्मीदर्शनाला हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





