Manchar Election: निवडणुकीचा ज्वर की डोकेदुखी? मंचरमध्ये उमेदवारांच्या ‘या’ कृतीमुळे व्यापारीही संतापले

प्रभात वृत्तसेवा
मंचर – मंचर शहरात निवडणुकीची प्रचारमोहीम जोरात सुरू असून विविध पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांच्या वाहनांवरील स्पीकरमधून होणारा कर्कश आवाज नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. व्यापारी, दुकानदार, रुग्णालयातील रुग्ण, तसेच शाळांमधील विद्यार्थी उच्च आवाजामुळे हैराण झाले असून, आवाजाची तीव्रता (डेसिबल) कमी ठेवावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
निवडणूक मतदानास अवघे तीन दिवस राहिल्यामुळे सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर, बाजारपेठेत, गर्दीच्या भागात स्पीकर लावून फिरणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.मात्र आवाजावर कोणताही नियंत्रण नसल्यामुळे अनेक ठिकाणी कानठळ्या बसवणारा ध्वनी निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सतत होत आहेत.
स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, दिवसभर सुरू असलेल्या कर्कश आवाजामुळे दुकानदार व ग्राहक दोघांनाही त्रास होतो. रुग्णालय परिसरातही शांततेची आवश्यकता असताना अचानक वाढणारा आवाज रुग्णांच्या प्रकृतीवर परिणाम करतो, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे.शाळांमध्ये परीक्षा व नियमित अध्यापन सुरू असताना या प्रचारमुल्य आवाजामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असल्याचीही तक्रार पुढे येत आहे.
नागरिकांनी पोलीस विभागाने तसेच निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करून ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणावे, डेसिबलची मर्यादा ठरवून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.निवडणूक प्रचाराची गती वाढत असताना शहरातील शांतता व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.




