प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला काही तासच उरले असताना नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले सर्वच उमेदवार सोमवारी (दि. 1) दिवसभर मतप्रचाराऐवजी आध्यात्मिक दौर्यावर दिसले. निवडणुकीत शुभ फलप्राप्ती व्हावी आणि मतदारांचा जास्तीत जास्त पाठिंबा मिळावा, यासाठी उमेदवारांनी ग्रामदैवत तसेच शहरातील विविध देवस्थानांना भेट देत मनोभावे प्रार्थना केली. ग्रामदैवताचे दर्शन घेऊन चांगलं मतदान होऊन आम्हाला विजय लाभावा अशी प्रार्थना उमेदवारांकडून करण्यात आली. देवदर्शनानंतर उमेदवार आणि त्यांचे प्रमुख कार्यकर्ते शहरातील ज्येष्ठ नागरिक, आदरणीय बुजुर्ग आणि सामाजिक क्षेत्रात अग्रणी असणार्या मान्यवरांच्या भेटीगाठीसाठीही गेले. या भेटीत ज्येष्ठांकडून आशीर्वाद तसेच निवडणुकीबाबत शुभेच्छा घेण्यात आल्या. मतदानाच्या अगदी पूर्वसंध्येला उमेदवारांनी घेतलेली ही धावपळ मतदारांशी असलेले नाते जपण्यासाठी आणि शुभेच्छा मिळविण्यासाठी असल्याचे दिसून आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना काही उमेदवारांनी, जनतेचा विश्वास, देवांचे आशीर्वाद आणि ज्येष्ठांची साथ मिळाली तर निश्चितच विजय मिळेल, असे मत व्यक्त केले.