Manchar Election: नगराध्यक्ष आणि १६ प्रभागांच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी; ४० कर्मचारी नियुक्त

प्रभात वृत्तसेवा
मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी बुधवार (दि. 3) तालुका क्रीडा संकुल येथे होणार असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी प्रक्रिया दीड ते दोन तासांत पूर्ण होऊन विजयी उमेदवारांची घोषणा केली जाईल. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली कुलकर्णी यांनी दिली.
या प्रक्रियेसाठी 40 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मतदान प्रक्रियेसाठी एकूण 120 कर्मचार्यांची नेमणूक केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अंजली कुलकर्णी कार्यभार सांभाळत असून कार्यालयीन अधीक्षक म्हणून वरद थोरात यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. 24 मतदान केंद्रांवरील मतमोजणी 10 टेबलांवर प्रभागनिहाय करण्यात येणार असून याचवेळी नगराध्यक्ष पदाचीही मतमोजणी होणार आहे.
अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद जाधव यांनी दिली. मतदान कर्मचार्यांना सुरळीत व अचूक कामकाजासाठी दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आले असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व सुरक्षित वातावरणात पार पडावी. यासाठी आवश्यक तयारी तातडीने पूर्ण केली आहे.





