Manchar APMC : बाजार समितीत बटाटा वाणाची खरेदी थांबली? ; वाढत्या भावाचा लागवडीला फटका

प्रभात वृत्तसेवा
मंचर – मंचर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या बटाटा वाणाच्या किमतीत वाढ झाली असून किमती वाढल्याने शेतकऱ्यांनी बटाटा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. विविध राज्यात अतिवृष्टीमुळे तेथील बटाटा वाण खराब झाला आहे. त्यामुळे येथील बटाटा वाणाचे बाजारभाव कडाडले आहे.त्याचा फटका बटाटा लागवडीवर होणार असून बटाटा लागवड घटणार असल्याचे मत बटाटा वाणाचे बटाटा वाणाचे व्यापारी संजय मोरे यांनी सांगितले.
या वर्षी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा वाण विक्री हंगाम ५ ऑगस्ट रोजी सुरू झाला. त्यावेळी बटाटा वाण बाजार भाव प्रतिक्विंटल २००० पासून २३०० रुपयेपर्यंत राहिला. मधल्या काळातील अतिवृष्टीमुळे मंचर मार्केटला तीन आठवडे कुठलाही शेतकरी आला नाही.त्यामुळे मोठे नुकसान झाले.बटाटा वाण विक्रीसाठी वीस गाड्या मार्केटला आल्या होत्या. त्यापैकी दहा टक्के माल सडला. अशीच परिस्थिती पश्चिम बंगाल, गुजरात इंदोर, बिहार, उत्तर प्रदेश मध्ये येथे ही झाल्यामुळे बटाट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
त्यामुळे बटाट्याचा वाणाचा तुटवडा जाणू लागल्याने बटाट्याच्या वाणाच्या किमती वाढल्या असून सध्या ३३०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे.वाढलेल्या बाजारभावामुळे बटाटा लागवड कमी होईल ५० टक्केच बटाटा वाणाची विक्री होईल, असा अंदाज बटाटा व्यापारी राजेंद्र भन्साळी,दत्ता भोर,बाळासाहेब थोरात यांनी वर्तवला आहे. दरवर्षी मंचर मार्केटला अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, लातूर, बीड, परभणी, नांदेड, धाराशिव येथून मोठ्या प्रमाणात बटाटा वाणाची मागणी असते.
मात्र, यावर्षी शेतकरी भाव वाढल्याने बियाणे घेत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.तसेच अतिवृष्टी पावसाचा फटका बसला आहे.मंचर मार्केटमध्ये ऑगस्ट ते जानेवारी अखेरपर्यंत एक हजार ट्रक बटाटा वाण विक्री होतो. मात्र, यावर्षी बटाटा वाणाचे बाजार भाव वाढले आणि अतिवृष्टीमुळे ग्राहक कमी झाल्याचे दिसून आले.भविष्यात बटाटा मालाचे चांगले पैसे होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
“मंचर बाजार समितीत येणाऱ्या ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांचे नेहमी सहकार्य असते. बटाटा वाण किंवा कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आला आहे. बाजार समितीच्या वतीने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना चांगल्या चांगल्या सुविधा देण्याचा बाजार समितीचा नेहमीच प्रयत्न आहे.”
– निलेश स्वामी थोरात, सभापती, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती.





