नवी दिल्ली – दिल्लीचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनन शर्मानेही आता भारतीय क्रिकेटला रामराम करत अमेरिकेत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजय शर्मा यांचा मुलगा असलेल्या मननने देशांतर्गत क्रिकेटमध्ये भारतीय संघात निवड व्हावी यासाठी देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने सरस कामगिरी केली. मात्र, तरीही त्याचा संघ निवडीसाठी विचार झाला नाही. अखेर निराश होत त्याने बीसीसीआयला रामराम केला.
2017 साली दिल्लीकडून पदार्पण केल्यापासून त्याने 35 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 27.45 च्या सरासरीने 1 हजार 208 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये एका अर्धशतकासह त्याच्या नावावर 560 धावा आहेत.
त्याने 113 प्रथम श्रेणी बळीही घेतले असून 26 टी-20 सामन्यात 32 बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये मननला 2016 साली कोलकाता नाईट रायडर्सने 10 लाख रुपयांत खरेदी केले होते.
2010 साली 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. भारत सोडून अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी उन्मुक्त चंद आणि समित पटेल यांनीही अमेरिकेत जाऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे.