अजित पवारांचे पालिकेला खडेबोल
पुणे – करोनाबाधितांना शहरातील हॉस्पिटल्समध्ये बेड मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. “माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. माणूस वाचला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत उपचाराची गरज असलेल्या नागरिकांना उपचार मिळालेच पाहिजेत. काहीही करा रुग्णालयात करोनाबाधितांना बेड मिळायलाच पाहिजे,’ अशा शब्दांत पवार यांनी महापालिकेला सूचना दिल्या.
रुग्णालयातील बेडचे व्यवस्थापन ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करा, अशा सूचना पवार यांनी केल्या. बेड देताना मानवी हस्तक्षेप टाळून संगणकीय प्रणालीद्वारे बेडचे वाटप होणार आहे. शासकीय विश्रामगृह येथील बैठकीत पवार यांनी सूचना दिल्या. जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा.
करोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पिटलचे बेड व्यवस्थापन, डॉक्टरचे नियोजन या सर्व महत्त्वाच्या उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीच्या मदतीने नियोजन करा, त्यामुळे नियोजनात आणखी सुसूत्रता येईल. कंटेन्मेंट झोननिहाय उपाययोजनांची पाहणी करा. निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.