पुणे -कोथरूडमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना पैसे पुरवठा करणाऱ्या एकास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरी परिसरातून अटक केली. तो मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तो एका नामांकित कंपनीत कामाला असून, त्याला वार्षिक 15 लाख रुपयांचे पॅकेज असल्याचे एटीएसने सांगितले. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले, त्यावेळी दि. 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सिमाब नसरुद्दीन काझी (वय 27, रा. कौसरबाग, कोंढवा, मूळ रा. पंढेरी, रत्नागिरी) याला अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी दुचाकी चोरण्याच्या तयारीत असलेल्या मोहंमद इम्रान युनूस खान आणि मोहंमद युनूस याकूब साकी (दोघे रा. रतलाम, मध्य प्रदेश, सध्या कोंढवा) यांना गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली. या दोघांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून मूळच्या गोंदिया येथील आणि सध्या कोंढवा परिसरात वास्तव्याला असलेल्या अब्दुल कादिर दस्तगीर पठाण याला पोलिसांनी अटक केली होती. या तिघांची एकत्रित चौकशी सुरू आहे. तपासामध्ये सिमाब नसरुद्दीन काझी याने अब्दुल कादिर दस्तगीर पठाण याला पैसे पुरविल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सहायक पोलीस आयुक्त अरुण वायकर आणि विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. सिमाब काझी याने अब्दुल पठाण याच्या बॅंक खात्यावर पैसे पाठविले. ते पैसे पुढे मोहंमद खान आणि मोहंमद साकी यांना टेरर फंडिंगसाठी दिले गेले. सिमाबने किती पैसे दिले आहेत, अजून त्याला कोणी मदत केली आहे का, याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने ती मान्य केली. आरोपींच्या वतीने ऍड. यशपाल पुरोहित यांनी काम पाहिले.