ममता मोहंता यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या ओडिशामधील नेत्या ममता मोहंता यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला. बिजू जनता दलाला (बिजद) रामराम ठोकल्यानंतर पुढच्याच दिवशी त्यांनी पक्षबदल केला. त्या घडामोडीमुळे बिजदमधून आऊटगोईंग सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. मोहंता यांनी बुधवारी बिजदला राजकीय हादरा देत त्या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.
एवढेच नव्हे तर, त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे त्या सत्तारूढ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. अपेक्षेप्रमाणे मोहंता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात त्यांनी त्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. ओडिशात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक झाली.
त्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारून भाजपने ओडिशाची सत्ता काबीज केली. त्यामुळे बिजदला त्या राज्याची प्रदीर्घ सत्ता गमवावी लागली. आता सत्ताधारी बनल्यानंतर ओडिशात आपली स्थिती आणखी भक्कम करण्यावर भाजप भर देणार असल्याचे मानले जाते. त्यासाठी त्या पक्षाची भिस्त इनकमिंगवर असेल. प्रामुख्याने, बिजदमधील नेत्यांसाठी दरवाजे खुले ठेवण्याची रणनीती भाजप अवलंबू शकतो.





