‘मी जिवंत असेपर्यंत….’, सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयावर ममता बॅनर्जींचे भाष्य, म्हणाल्या…

West Bengal school jobs case | पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. कोलकात्यातील नेताजी इंडोर स्टेडियममध्ये त्यांनी नुकतेच बडतर्फ करण्यात आलेल्या शिक्षकांशी संवाद साधला. ‘सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आम्ही मान्य केला आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही भावना शून्य आहोत. बोलल्यामुळे मला तुरुंगात जावं लागलं तरी मला त्याची पर्वा नाही., अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पश्चिम बंगाल शालेय सेवा आयोगाने 2016 मध्ये घेतलेल्या भरती प्रक्रियेत अनियमितता आढळल्याने, गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने तब्बल 25,000 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द केली होती. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, ही संपूर्ण भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आली होती आणि यावर कुठलाही तोडगा शक्य नाही.
ममता बॅनर्जी यांनी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करताना म्हटले की, “कोण पात्र आहे आणि कोण नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करायला हवे. आम्हाला त्यांची यादी द्यावी. संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यात अनेक मृत्यू झाले, अद्याप न्याय मिळालेला नाही. नीट परीक्षेतही अनियमितता झाली, तरी ती परीक्षा रद्द झाली नाही. मग केवळ बंगाललाच का लक्ष्य केलं जात आहे?” जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत कोणाचीही नोकरी जाऊ देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
शिक्षकांच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, “नववी ते बारावीपर्यंत शिकवणारे हे शिक्षक ही उच्च शिक्षण व्यवस्थेसाठीचे एन्ट्री गेट आहेत. त्यापैकी अनेक सुवर्णपदक विजेते आहेत. आज तुम्ही त्यांना चोर, अकार्यक्षम म्हणता? असा निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला?”
“ही एक साखळी आहे. शिक्षण व्यवस्थेला कमकुवत करण्यासाठीचा डाव आहे. पण मी शांत बसणार नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. दोन महिने त्रास सहन करा, पण पुढची 20 वर्षे त्रास सहन करावी लागणार नाहीत. त्या दोन महिन्यांचं नुकसान मी भरून काढेन. तुम्हाला भीक मागावी लागणार नाही,” असे देखील त्या म्हणाल्या.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करत आहे. मात्र या परिस्थितीचा योग्य आणि न्याय्य मार्गाने विचार करत मी पुढील निर्णय घेणार आहे. काही बाबतीत माझं नाव गोवण्यात आलं, ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही.”





