Mamata Banerjee : भाजप लवकरच सत्तेवरून जाईल; ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा
तृणमूल कॉंग्रेसच्या संस्थापिका ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गुरूवारी सनसनाटी दावा केला. लवकरच भाजप सत्तेवरून जाईल. त्यासाठी २०२९ यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागणार नाही.

Mamata Banerjee : तृणमूल कॉंग्रेसच्या संस्थापिका ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गुरूवारी सनसनाटी दावा केला. लवकरच भाजप सत्तेवरून जाईल. त्यासाठी २०२९ यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागणार नाही. काय घडते ते पहा. खेळ सुरू झाला आहे, असे भुवया उंचावणारे भाष्य त्यांनी केले. ममता दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
सध्याची राजकीय स्थिती लवकरच बदलू शकते. अर्थात, दोन, तीन की सहा महिने लागतील ते नेमकपणाने सांगता येऊ शकत नाही. मी ज्योतिषी नाही. पण, लवकरच गुड न्यूज मिळेल असे वाटते, असे त्या (Mamata Banerjee) म्हणाल्या. भाजप वर्ष २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत हेराफेरी करून जिंकला. अर्थात, त्या पक्षाला बहुमत मिळाले नाही. आताही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तो पक्ष पोटनिवडणुका जिंकू शकतो.
मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पदावरून जायला हवेत. निवडणूक व्यवस्थेत सुधारणा गरजेच्या आहेत. त्यासाठी विरोधक एकत्रितपणे लढतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीची बैठक बुधवारी झाली. त्यासाठी ममता (Mamata Banerjee) दिल्लीत दाखल झाल्या. इंडिया आघाडीच्या बैठकीतून विरोधकांनी ऐक्याचे दर्शन घडवले. तसेच, कथित मतचोरीविरोधात व्यापक लढा उभारण्याचा निर्धार त्यांनी केला.
मतदारयाद्या पडताळणीतील (एसआयआर) कथित अनियमितता, निवडणूक आयोगाचे कामकाज, कुमार यांची कार्यशैली आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यांनी कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही घेरण्याचे सत्र आरंभले आहे. विरोधक व्यापक आणि संयुक्त लढ्यासाठी सज्ज झाल्याच्या पार्श्वभूमीवर ममतांनी (Mamata Banerjee) भूमिका मांडली.






