Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने दिला राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा
तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. शांतनु सेन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून तो पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याकडे पाठवला आहे.

Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. शांतनु सेन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठवलेल्या आपल्या राजीनामा पत्रात, सध्याची राजकीय परिस्थिती आणि अलीकडील वादांचा हवाला देत पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या राजीनामा पत्रात डॉ. शांतनु सेन यांनी लिहिले आहे की, अनेक कठीण प्रसंगी मी पक्षाच्या विचारांशी सहमत नसतानाही, माध्यमांमध्ये अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर पक्षाची बाजू खंबीरपणे मांडली आणि पक्षासाठी (Mamata Banerjee) लढा दिला.
यासाठी सामान्य जनतेनेही अनेकदा माझे कौतुक केले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पक्षाची बाजू घेणे आणि त्याचा बचाव करणे आता आपल्याला शक्य राहिलेले नाही, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
आपल्या पत्रात त्यांनी आर.जी. कर रुग्णालय प्रकरण, अभया प्रकरण आणि कॅश फॉर जॉब भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर प्रकरणांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या अनैतिक घटना आणि भ्रष्टाचारामुळे पश्चिम बंगालच्या जनतेने पक्षाला नाकारले आहे. जनतेच्या या कौलाचा आदर करत आपण तृणमूल काँग्रेसच्या अखिल भारतीय प्रवक्तेपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपल्या राजीनाम्याचा स्वीकार करावा आणि त्यांच्या या निर्णयाचा आदर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. शांतनु सेन यांचे हे पाऊल तृणमूल काँग्रेससाठी एक मोठा राजकीय धक्का मानले जात आहे, कारण त्यांनी प्रदीर्घ काळ प्रसारमाध्यमांमध्ये आणि सार्वजनिक मंचांवर पक्षाची बाजू अत्यंत भक्कमपणे मांडली होती.






