ममता बॅनर्जी आणि गौतम अदानी यांची अचानक भेट; गुंतवणुकीच्या शक्यतांवर चर्चा?
Updated On:

कोलकता –उद्योगपती गौतम अदानी यांनी सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. दोघांमध्ये राज्य सचिवालयात सुमारे तासभर चर्चा झाली. त्या चर्चेचा तपशील तातडीने समजू शकला नाही. मात्र, गुंतवणुकीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली.
देशातील आघाडीच्या उद्योगपतींमध्ये अदानी यांचा समावेश होतो. मात्र, त्यांच्यावरून सातत्याने राजकीय वाद रंगताना दिसतो. प्रामुख्याने कॉंग्रेसकडून अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटच्या संबंधांवर टीका केली जाते. तसे असले तरी इंडिया आघाडीतील कॉंग्रेसचे काही मित्रपक्ष तशी टीका टाळताना दिसतात. त्या पार्श्वभूमीवर, ममता आणि अदानी यांची भेट कुतूहल वाढवणारी आहे.





