Malshej Ghat Project: माळशेज घाट-भोरांडे प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट! एमपीसीबीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Malshej Ghat Project: अदानी रिन्युएबल एनर्जीच्या १,५०० मेगावॅट माळशेज घाट-भोरांडे पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी २१ ऑगस्टला पर्यावरणीय जनसुनावणी.

Malshej Ghat Project – माळशेज घाट-भोरांडे पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी पर्यावरणीय जनसुनावणी घेण्यात येणार आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाची जनसुनावणी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई येथे होणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) याबाबत कार्यालयीन आदेश काढून जनसुनावणी पॅनेल निश्चित केले आहे.
पुण्यातील माळशेज घाट-भोरांडे पंप्ड स्टोरेज प्रकल्पाची क्षमता १ हजार ५०० मेगावॅट आहे. पंप्ड स्टोरेज प्रकल्पामध्ये पाण्याचा वापर करून वीज साठविण्याची आणि विजेची गरज वाढल्यानंतर तिचे उत्पादन करण्याची व्यवस्था केली जाते. हा प्रकल्प पुणे आणि ठाणे जिल्ह्यांशी संबंधित असून त्याचा प्रस्ताव अदानी रिन्युएबल एनर्जी फिफ्टी-टू लिमिटेड यांच्याकडून देण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या १४ सप्टेंबर २००६ रोजीच्या अधिसूचनेनुसार तसेच १ डिसेंबर २००९ रोजीच्या सुधारित अधिसूचनेनुसार, या प्रकल्पासाठी जनसुनावणी पॅनेल निश्चित करण्यात आले आहे. पॅनेलमध्ये ठाणे जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या प्रतिनिधींपैकी उपविभागीय दंडाधिकारी पदापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी अध्यक्ष म्हणून राहणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण येथील प्रादेशिक अधिकारी सदस्य, तर एमपीसीबीचे कल्याण-३ येथील उपप्रादेशिक अधिकारी संयोजक म्हणून काम पाहणार आहेत. पर्यावरणीय मंजुरीच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्यापैकी ही एक जनसुनावणी आहे. या सुनावणीत प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिक, संबंधित घटक आणि प्रशासनासमोर पर्यावरणाशी निगडित मते, सूचना तसेच हरकती मांडण्याची संधी आहे. एमपीसीबीने नियुक्त केलेले पॅनेल ही सुनावणी घेणार आहे.





