Mallikarjun Kharge : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे देशात गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले असून, केंद्र सरकारने यावर तातडीने संसदेत सविस्तर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी काँग्रेसने (Mallikarjun Kharge) बुधवारी केली. देशातील जनतेला खरे काय ते जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे स्पष्ट करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर देशाला उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे. युद्धामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला असून इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे. यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधताना खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सोशल मीडियाद्वारे सरकारला धारेवर धरले. केंद्र सरकारला या युद्धाची पूर्वकल्पना असतानाही ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत, असा आरोप त्यांनी केला. सध्या देशात एलपीजी सिलिंडरचे रॅशनिंग सुरू झाले असून घरगुती गॅससाठी ग्राहकांना २५ दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या संकटाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसत असल्याचे सांगताना खर्गे म्हणाले की, इंधन टंचाईमुळे खतांचा पुरवठा विस्कळीत झाला असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तसेच ६० हजार टन बासमती तांदळाची निर्यात रखडली असून औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कापड उद्योग, पोलाद, ऑटोमोबाईल आणि विमान वाहतूक क्षेत्रावरही याचा मोठा आर्थिक बोजा पडत असून महागाईचा आगडोंब उसळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र, सत्य परिस्थिती वेगळी … यापूर्वी नोटाबंदी आणि कोरोना काळातील सरकारच्या व्यवस्थापनावरही खर्गे यांनी टीका केली. नोटाबंदीवेळी ५० दिवसांत परिस्थिती सुधारेल असे सांगण्यात आले होते, तर कोरोना काळात गंगा नदीतील मृतदेहांचे भीषण वास्तव देशाने पाहिले आहे. आताही सरकारकडे ७४ दिवसांचा तेल साठा असल्याचे सांगितले जात असले तरी जमिनीवर परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, असे खर्गे म्हणाले.