Mallikarjun Kharge : जनशक्ती शहांना बाहेर येण्यास भाग पाडेल; खर्गेंचा हल्लाबोल
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी गुरूवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला.

Mallikarjun Kharge : कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी गुरूवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाईसाठी खर्गे यांनी शहांना थेट जबाबदार ठरवले. तसेच, जनशक्ती जबाबदारी निश्चित करण्यासाठी शहांना बाहेर येण्यास भाग पाडेल, असा इशाराही दिला.
लोकसभेत मंजूर झालेले सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक राज्यसभेत (Mallikarjun Kharge) मांडण्यात आले. त्यावरील चर्चेत सहभागी होत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असणाऱ्या खर्गे यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहांवर टीकेची झोड उठवली. त्यांनी चर्चेवेळी मोदी आणि शहा अनुपस्थित असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहा गृहमंत्री आहेत. विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून सर्वच अस्वस्थ झाले आहेत. मात्र, शहा मौन बाळगून आहेत. त्यांचे तोंड कोणी शिवलेयं का? देशातील विद्यार्थ्यांनी नुकताच सरकारला धडा शिकवला. त्यापेक्षा मोठा धडा ते शिकवतील, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांवर कारवाईचा आदेश कुणी दिला, विद्यार्थ्यांना मारहाण करणारे साध्या वेशातील लोक कोण होते या प्रश्नांची उत्तरे शहांनी द्यावीत. उत्तरे देता येत नसतील; तर शहांनी राजीनामा द्यावा. बिहार, पश्चिम बंगालसारख्या राज्यांतही पोलिसांनी कारवाई केली. विद्यार्थ्यांवर एके-४७ रायफलमधून गोळीबार करण्यात आला, असा आरोप खर्गे यांनी केला.
देशातील विद्यार्थ्यांना, युवकांना शांत करण्यासाठी सरकारने विधेयक (Mallikarjun Kharge) आणले. मात्र, पेपरफुटी रोखण्यासाठी कुठल्या पद्धतीने परीक्षा घेणार ते सरकारने स्पष्ट केले नाही. पेपरफुटी कशी रोखणार याची स्पष्टता विधेयकातून येत नाही. मोदींना स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रिपदावरून हटवणे भाग पडले, असा आरोपवजा दावाही त्यांनी केला.






