Mallikarjun Kharge : कॉंग्रेस आणि खर्गेंनी माफी मागावी; आजी- माजी राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा भाजपकडून आरोप

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला. यासोबतच पक्षाने त्यांच्याकडून आणि काँग्रेसकडून जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी छत्तीसगडमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती मुर्मू आणि माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या नावांचा चुकीचा उच्चार केला होता. तथापि, त्यांनी नंतर त्यांची चूक सुधारली.
सोमवारी रायपूरमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्षांनी असेही म्हटले की, भाजप नेहमीच (द्रौपदी) मुर्मू जी आणि (रामनाथ) कोविंद जी यांना देशाचे राष्ट्रपती बनवण्याबद्दल बोलत असते, पण पक्षाने हे सर्व आमची मालमत्ता, जंगल, पाणी आणि जमीन हिसकावून घेण्यासाठी केले आहे का? पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी आरोप केला की खर्गे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरतात.
त्यांनी असाही आरोप केला की हे काँग्रेसच्या डीएनएमध्ये असलेल्या दलितविरोधी, आदिवासीविरोधी आणि संविधानविरोधी मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. तुम्ही तुम्ही रामनाथ कोविंद जींना कोविड म्हटले, तुम्ही राष्ट्रपतींना मुरमाजी म्हणता आणि नंतर त्यांना (राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू) भूमाफिया म्हणता, मालमत्ता, जंगले हिसकावून घेण्यासाठी त्या राष्ट्रपती झाल्याचा आरोप करता.
गौरव भाटिया यांनी राष्ट्रपतींविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल मल्लिकार्जुन खर्गे यांनी माफी मागावी अशी मागणी करत त्यांनी आरोप केला की काँग्रेस अध्यक्षांनी केवळ त्यांचा अपमान केला नाही तर त्यांच्या वक्तव्याने आदिवासी आणि दलित समुदायाच्या सदस्यांच्या भावना दुखावल्या आहेत. जर काँग्रेस आणि खर्गे यांनी माफी मागितली नाही, तर देशातील प्रत्येक नागरिक आपला राग व्यक्त करेल हे तुम्हाला दिसेल. ही चूक काँग्रेसला महागात पडेल.





