Mallikarjun Kharge : “चांगले मित्र देश, जग उद्धवस्त करण्यात व्यस्त..”; मल्लिकार्जुन खर्गे यांचा मोदी आणि ट्रम्प यांच्यावर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी देश, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संपूर्ण जग उद्धवस्त करत आहेत. दोघेही एकमेकांना चांगले मित्र म्हणवतात.

Mallikarjun Kharge | Donald Trump | Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी देश, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संपूर्ण जग उद्धवस्त करत आहेत. दोघेही एकमेकांना चांगले मित्र म्हणवतात. त्यांच्यामुळे जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी सोडले.
पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून भारताने अलिप्ततावादी धोरण स्वीकारले. तसेच, सर्व देशांशी चांगले संबंध ठेवले. मात्र, ते धोरण आता सोडून देण्यात आले आहे.
त्याचे विपरीत परिणाम देशावर होताना दिसत आहेत, असे म्हणत खर्गे यांनी इंधन दरवाढीचा ठपका ट्रम्प यांच्यावर ठेवला. ते कर्नाटक कॉंग्रेसच्या महाअधिवेशनात बोलत होते.
महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून खर्गे यांनी मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना केवळ काही लोकांच्या हाती सत्तासुत्रे सोपवण्यात रस आहे.
जनतेकडे आणि विशेषत: गरीब, कामगार आणि विद्यार्थ्यांकडे ते दुर्लक्ष करत आहेत. एक दिवस मोदी सरकार कोसळेल. काही काळ संयमाने प्रतीक्षा करा. मोदींसमोर मोठे संकट उभे ठाकणार आहे, असा इशारेवजा दावा त्यांनी केला.
नीट आणि इतर परीक्षांच्या गोंधळावरूनही खर्गे यांनी सरकारला लक्ष्य केले. व्यवस्थितपणे परीक्षा घेणेही सरकारला जमत नाही. मोदी सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थी, पालकांचा विश्वासघात केला. प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा, या मागणीचाही त्यांनी पुनरूच्चार केला.





