Malhar Lake: कोंढापुरीचा ‘मल्हार तलाव’ झाला कोरडा ठाक! शिरूरच्या पाणी नियोजनाची पोलखोल
Malhar Lake: मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा आणि चासकमानच्या पाण्याचा पाठपुरावा; शिरूर तालुक्यातील पाणी नियोजनावर उपस्थित होत आहेत प्रश्नचिन्ह.

Malhar Lake – कोंढापुरी (ता. शिरूर) येथील मल्हार तलावाची अवस्था सध्या बिकट झाली असून तलाव अक्षरशः कोरडा ठाक पडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. एकेकाळी परिसरातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना जीवनदान देणाऱ्या या तलावात आज पाण्याचे केवळ छोटे-छोटे डबके शिल्लक राहिले आहेत. तलावाचा विस्तीर्ण तळ उघडा पडल्याने प्रशासनाच्या जलव्यवस्थापनावरील दाव्यांची पोलखोल होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
तलावावर परिसरातील अनेक गावांतील शेती, पिण्याचे पाणी, पशूधनासाठी पाणी अवलंबून आहे. मात्र, सध्या तलावातील भीषण परिस्थितीमुळे शेतकरी, ग्रामस्थ, पशुपालक चिंतेत सापडले आहेत. चासकमान धरणातून पाणी सोडण्याबाबत सातत्याने मागणी होत असतानाही अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, तलावात वेळेवर पाणी सोडले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. तलाव कोरडा पडल्याने विहिरी, बोअरवेल आणि भूजल पातळीवरही गंभीर परिणाम झाला आहे.
अनेक भागांत पाण्याची पातळी खालावली असून आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, रांजणगाव गणपती, कोंढापुरी, पिंपरी दुमाला, वाघाळे, गणेगाव, खंडाळे, जातेगाव परिसरातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून चासकमानचे पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र, प्रशासन आणि संबंधित यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, मान्सूनचे आगमन जवळ आले असले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता संपूर्ण परिसराचे लक्ष आकाशाकडे लागले असून नागरिकांना पावसाची आणि शेतकऱ्यांना चासकमानच्या पाण्याची प्रतीक्षा आहे. पाऊस लांबल्यास शेती हंगामावर परिणाम होण्याबरोबरच पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होणार आहे.
शिरूर तालुक्यात भीषण स्थिती
कोंढापुरी तलावाचे कोरडे पडलेले हे चित्र केवळ एका तलावाची अवस्था नसून शिरूर तालुक्यातील जलनियोजन, पाणी व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या उदासीनतेचे वास्तव दर्शवणारे आहे. आता तरी लोकप्रतिनिधी, पाटबंधारे विभाग आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून चासकमान प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा नागरिक आणि शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.





