Khadakwasla Irrigation Department : पाटबंधारे विभागाचे आश्वासन हवेत! ३ जून रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन फोल; शेतकरी आक्रमक
Khadakwasla Irrigation Department : ऊसासह इतर पिके पाण्याअभावी जळून चालल्याने इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठे आर्थिक संकट; पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह.

Khadakwasla Irrigation Department – खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३ जून रोजी कालव्याला पाणी सोडण्याचे दिलेले आश्वासन अखेर फोल ठरले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी पुन्हा एकदा निराशेचा सामना करावा लागत असल्याने, पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे येथील सिंचन भवन येथे २५ मे रोजी आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी व आंदोलनकर्त्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांनी ३ जून रोजी पाणी सोडण्याचे तोंडी आश्वासन तालुक्याच्या दोन्ही आजी-माजी नेत्यांसमोर दिले होते. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते.
मात्र, आज ४ जून तारीख उजाडली तरी खडकवासला कॅनल अद्याप कोरडाच ठाक आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांमधील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून हक्काच्या पाण्याची मागणी करत आहेत. पाटबंधारे विभागाच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रत्यक्षात कालव्यात पाणीच न आल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.
सध्या ऊसासह इतर पिके पाण्याअभावी जळून चालली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या प्रकरणी खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, “सध्या मिटिंग चालू आहे, नंतर सांगतो,” असे त्रोटक उत्तर देऊन त्यांनी अधिक बोलणे टाळले.
“इंदापूरच्या वाट्याचे पाणी कुठे मुरते?”
वरील तालुक्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळते, मग इंदापूर तालुक्याच्या वाट्याचे पाणी कुठे मुरते? असा संतप्त प्रश्न सध्या या भागातील लाभधारक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार की नाही, असाही सवाल विचारला जात आहे. “जर नेत्यांना आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नसेल, तर त्यांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवून देऊ,” असा निर्वाणीचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.





