Malegaon Blast | मालेगाव बॉम्बस्फोट संबंधित खटल्याचा आज निकाल लागणार आहे. मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयात निकाल सुनावण्यात येणार आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय गुरुवारी निकाल देणार आहे. या बॉम्बस्फोटामध्ये ६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. १०० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. या घटनेला १७ वर्ष पूर्ण झाले आहेत. आता या खटल्यातून भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींची सुटका होणार की त्यांना दोषी ठरवले जाणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि भाजपच्या भोपाळ येथील माजी खासदार प्रज्ञासिहं ठाकूर यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर विशेष न्यायालयाने बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड विधान आणि शस्त्रास्त्र कायदा अशा महत्त्वाच्या कायद्यांतर्गत दहशतवादाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवला. Malegaon Blast | काय आहे प्रकरण ? मालेगावमधील भिक्खू चौकातील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी रात्री ९.३५ वाजता हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता. रमजानचा महिना सुरु असताना मशिदीजवळच्या एका मोटरसायकवर ठेवलेल्या स्फोटकांद्वारे हा बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यामध्ये ६ निष्पाप मुस्लिम नागरिकांचा मृत्यू तर १०० जण जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती. Malegaon Blast | या बॉम्बस्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. घटनास्थळी सापडलेली मोटरसायकल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मालकीची असल्याचे समोर आल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मालेगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्यानंतर सुरुवातीला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणाचा तपास केला होता. त्यानंतर, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, नंतर एनआयएकडे वर्ग केला गेला. प्रदीर्घ काळानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने आरोपींवर दहशतवादाच्या आरोपांतर्गत आरोप निश्चित केले आणि खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरुवात झाली. Malegaon Blast | गेल्या १७ वर्षांपासून मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना यापूर्वी जामीन मंजूर करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी एनआयएने साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात संशयितांना मृत्यूदंडाची मागणी केली होती. त्यानंतर आज या प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. हेही वाचा : Pimpri : अस्तित्वाच्या लढाईसाठी मावळात राजकीय रणकंदन